Satara Flood : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची करणार पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 11:44 PM2021-07-25T23:44:50+5:302021-07-25T23:46:15+5:30
Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी १०.४५ वाजता पुण्याहून कोयनानगरकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. दुर्घटनाग्रस्त भागांची हवाई पाहणी करून मुख्यमंत्र्यांचे ११.३० वाजता कोयनानगर हेलिपॅडवर आगमन होईल.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २६ जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करतील. तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधतील. सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात भूस्खलन झाले असून मौजे आंबेघर आणि मौजे मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना झाल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी १०.४५ वाजता पुण्याहून कोयनानगरकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. दुर्घटनाग्रस्त भागांची हवाई पाहणी करून मुख्यमंत्र्यांचे ११.३० वाजता कोयनानगर हेलिपॅडवर आगमन होईल. नंतर ११.४० वाजता ते कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस भेट देतील व पूरग्रस्तांची विचारपूस करतील.
दुपारी १२.१५ वाजता कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १.२५ वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे रवाना होतील.
दरम्यान, मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे कोकणातील चिपळूण शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नसली तरी प्रचंड वित्तहानी झाली आहे. शहरातील बाजारपेठ पुरामुळे कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि शहरवासियांच्या व्यथा जाणून घेतल्या.