मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांच्या स्वागताला जाणार; मोदी-शहांची पुण्यात महत्वाची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 07:10 PM2019-12-05T19:10:33+5:302019-12-05T19:11:31+5:30
महाराष्ट्रात नुकतेच शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या एका अति महत्वाच्या बैठकीसाठी पुण्यात येणार आहेत. राजशिष्टाचारानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुण्यातील विमानतळावर मोदींच्या स्वागताला जाणार आहेत. महत्वाचे म्हणजे उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही पुण्यातच असणार असल्याने या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्रात नुकतेच शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बंद दाराआड ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीज वर्षांसाठी करू असे आश्वासन दिले होते, असा दावा ठाकरेंकडून करण्यात आला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचे नेते खोटे बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला होती. यामुळे शिवसेना भाजपाची युती तुटून दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. त्यातच शिवसेनेने एकमेव मंत्रीपदावर पाणी सोडून केंद्र सरकारमधून बाहेर पडली होती.
या सगळ्या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्या आधीच मोदी हे पोलिस महासंचालकांच्या बैठकीला पुण्यात येत आहेत. मोदी उद्या रात्री 9.50 च्या सुमारास पुण्यात येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे जाणार आहेत. तसेच याच दिवशी सरसंघचालक मोहन भागवतही एका कार्यक्रमासाठी पुण्यात असणार आहेत. यामुळे मोदी, शहा हे भागवतांना भेटणार का, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.