नव्या निकषानुसार लवकरच दुष्काळाची घोषणा करणार- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 05:56 PM2018-10-14T17:56:38+5:302018-10-14T17:57:00+5:30
राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पीक उत्पादकतेवर परिणाम झाल्याची कबुली देत यंदा नव्या निकषावर दुष्काळाची घोषणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अमरावती येथे दिली.
अमरावती : राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पीक उत्पादकतेवर परिणाम झाल्याची कबुली देत यंदा नव्या निकषावर दुष्काळाची घोषणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अमरावती येथे दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कुणाच्या मागणीनुसार अथवा अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार यापुढे दुष्काळ जाहीर केला जाणार नाही. नवीन नियमानुसार कार्यवाही केली जाईल. त्याचा आढावा घेतल्यानंतर ३१ आॅक्टोबरला टंचाईस्थिती जाहीर करण्यात येईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पुढील वर्षीचे नियोजन करणे आवश्यक आहे. कमी पावसामुळे खरीप हंगामाला फटका बसणार आहे. यापुढे शास्त्रीय पद्धतीनुसारच दुष्काळ जाहीर केला जाईल. पेरणी, पाऊस, भूजल पातळी, उत्पादन याचा विचार नवीन नियमानुसार होईल.
३१ आॅक्टोबरनंतर टंचाईस्थितीच्या अनुषंगाने उपाययोजनेचे निर्णय जाहीर केले जातील. केंद्र शासनाचे पथक पाहणीसाठी येईल. पाहणीनंतर व पूर्वीच्या स्थितीवरून उपाययोजना केल्या जातील. शेतक-यांना मदत व विमा देण्याबाबत तयारी केली आहे. धरणांतील पाणीसाठ्याबाबतदेखील आढावा घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पत्रकार परिषदेला आ. सुनील देशमुख, आ. रवी राणा, आ.अनिल बोंडे, आ. प्रभुदास भिलावेकर, आ.रमेश बुंदिले, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त पीयूषसिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, सीईओ मनीषा खत्री आदी उपस्थित होते.