मुख्यमंत्र्यांनी लबाड बोलल्याचे जाहीर करावे
By admin | Published: May 21, 2015 12:53 AM2015-05-21T00:53:42+5:302015-05-21T00:55:06+5:30
हसन मुश्रीफ : कोल्हापुरातील टोलप्रश्नी भाजप सरकारवर टीका
कोल्हापूर : ‘कोल्हापूर टोलमुक्त करू,’ ही घोषणा केवळ सत्तेवर येण्यासाठी केली होती. ते निवडणुकीतील वक्तव्य होते, आपण लबाड बोलल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावे. कोल्हापूरची जनता त्यांना माफ करेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
आमदार मुश्रीफ म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारने ‘एम. एच. ०९’ चा प्रस्ताव दिला होता. संपूर्ण टोलमाफीतील अडचणी आम्हाला माहिती होत्या, पण त्यावेळी चंद्रकांतदादा पाटील, राजेश क्षीरसागर व टोलविरोधी कृती समितीने अमान्य केले. त्याचा फटका आम्हाला बसला, जनतेने आम्हाला घरी बसविले. हे सगळे माहिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांत कोल्हापूर टोलमुक्त करण्याची घोषणा केली पण प्रत्यक्ष अंमलबजावणी काहीच नाही. मग विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी ही घोषणा केली काय? हे कोल्हापूरच्या जनतेसमोर जाहीर करून माफी मागावी.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरावेळी आमच्या मंत्र्यांना याच टोलविरोधी कृती समितीने काळे झेंडे दाखवले होते तर शिवसेनेने आमचे श्राद्धही घातले होते. त्यावेळी हेच चंद्रकांतदादा पाटील व राजेश क्षीरसागर पुढे होते. आता त्यांची भाषा कशी बदलली, असा सवालही त्यांनी केला. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी एका विधानसभा निवडणुकीत शेतीपंपाची वीज बिले माफ करण्याची घोेषणा केली होती. त्यानंतर त्यांनी हे निवडणुकीतील भाषण असल्याचे जाहीर सांगितले होते. जनतेने त्यांना माफ करून पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सत्ता दिल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. टोलविरोधी कृती समिती याबाबत काय भूमिका घेते त्यावर ‘उद्या बोलू’, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, अनिल साळोखे आदी उपस्थित होते.
बिंदू चौकात भाषण दाखवू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण नसेल तर त्यांनी केलेल्या भाषणाची सीडी बिंदू चौकासह कोल्हापूर शहरातील प्रत्येक चौकात लावू, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला
आहे.
...अन् डोहाळे जेवण
सरकारने टोलमुक्तीचे आश्वासन देऊन सात महिने उलटले. त्यामुळे टोलबाबत काय भूमिका घेणार आहे, हे जनतेला सांगा. कारण आता डोहाळे जेवणाची वेळ झाल्याची बोचरी टीकाही आमदार मुश्रीफ यांनी केली.