मुख्यमंत्रीच उत्तर देतील - तावडे
By admin | Published: August 26, 2015 02:20 AM2015-08-26T02:20:25+5:302015-08-26T02:20:25+5:30
गोविंदा मंडळांवर लादलेल्या निर्बंधाबाबत राज्य सरकारने ७२ तासांमध्ये निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही उत्सवात सहभागी होणार नाही, असा अल्टीमेटम या मंडळांनी मुख्यमंत्र्यांना दिला
मुंबई: गोविंदा मंडळांवर लादलेल्या निर्बंधाबाबत राज्य सरकारने ७२ तासांमध्ये निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही उत्सवात सहभागी होणार नाही, असा अल्टीमेटम या मंडळांनी मुख्यमंत्र्यांना दिला असल्याने तेच याबाबत उत्तर देतील, असा पवित्रा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी घेतला.
गोविंदा मंडळांवर थर लावण्याबाबत तसेच गोविंदांच्या वयाबाबत न्यायालयाच्या आदेशावरून बंधने घालण्यात आली आहेत. तसे आदेश राज्य शासनाने जारी केल्याने गोविंदा मंडळांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे काही मंडळांनी येत्या ७२ तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असा पवित्रा घेतला. दहीहंडी उत्सवावर बहिष्कार घालण्याची भाषा काही मंडळांनी केली आहे. याकडे तावडे यांचे लक्ष वेधले असता यंदा उत्सव दणदणीत साजरा केला जाईल. प्रत्यक्ष कोण उत्सवात भाग घेण्यास रस्त्यावर उतरले ते तुम्हाला पाहायला मिळेल. क्रीडा खात्याने याबाबत सर्व बाबी स्पष्ट करणारे पत्रक काढले असून उद्यापासून गोविंदा मंडळे सराव सुरु करतील, असे ते म्हणाले.
हंडीवरच्या सावटाने अस्वस्थ!
दहीहंडी उत्सवाबद्दल निर्माण झालेल्या संभ्रमाला पूर्णविराम देण्यासाठी सार्वजनिक दहीहंडी समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांना ७२ तासांची मुदत दिली. त्याला २४ तास उलटले तरीही शासनाकडून भूमिका स्पष्ट न केल्याने गोविंदांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
काही गोविंदा पथकांनी उत्सवावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. मात्र या सर्व परिस्थितीचा परिणाम हंडीच्या सरावावर होत असल्याने गोविंदा पथकांतील तरुणाईत शासनाविरोधात चीड आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेच्या प्रतिक्षेत असलेल्या गोविंदा पथकांनी सध्या तरी ‘गांधीगिरी’चा मार्ग अवलंबिला आहे. मुदतीअखेरीस शासनाकडून काहीच प्रतिसाद न आल्यास कठोर भूमिका घेण्यासाठी गोविंदा पथकांची समितीच्या सहाय्याने जोरदार मोर्चेबांधणी सुुरु आहे. त्यामुळे आता राज्य शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
राज्य शासनाला धोरण निश्चितीसाठी मुदत आणि अंतिम मसुदा देऊन त्याकडे शासन जाणीवपूर्वक काणा डोळा करत आहे. केवळ राजकीय भांडवल करून गोविंदा पथकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा उद्देश दिसून येतो आहे. त्यामुळे सणांच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन होणाऱ्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवावर निर्बंध लादू नये. उत्सवाबाबतचे संभ्रम राज्य शासानाने दूर करावेत अशी आग्रही मागणी गोविंदा पथकांतील तरुणाईकडून करण्यात येते आहे.
- बाळा पडेलकर, सार्वजनिक दहीहंडी समन्वय समिती, अध्यक्ष (श्री दत्त क्रीडा मंडळ)
सण वाचविण्यासाठी आम्ही स्वाक्षरी मोहिम राबविल्या; त्यामुळे राज्य शासनानेही आमच्या भूमिकेचा विचार करुन उत्सवाबाबत सकारात्मक निर्णय जाहीर करावा अशी मागणी आहे.
- आरती बारी, सार्वजनिक दहीहंडी समन्वय समिती, सहखजिनदार
उत्सवाबाबत वाढणाऱ्या संभ्रमाचा परिणाम सरावावरही होत आहे. यामुळे पथकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिवाय, केवळ दहा दिवसांवर दहीहंडी उत्सव येऊन ठेपला असतानाही उत्सव साजरा होण्याबाबत स्पष्टता नसल्याने गोविंदा पथकांनी करायचे का? हा सवाल पथकांसमोर उभा ठाकला आहे.
- अरुण पाटील, सार्वजनिक दहीहंडी समन्वय समिती, कार्याध्यक्ष
समितीतर्फे बालगोविंदाना सहभागी करुन न घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गोविंदा पथकांनाही उत्सवाला गालबोट लावायचे नाही. यासाठी दोन्ही बाजूंकडून सहकार्य अपेक्षित आहे. लवकरात लवकरशासनाने आपली भूमिका जाहीर करावी.
- कमलेश भोईर, सार्वजनिक दहीहंडी समन्वय समिती, सचिव ( यंग उमरखाडी गोविंदा पथक)
खात्याने पत्रक काढले
क्रीडा खात्याने या संदर्भात सर्व बाबी स्पष्ट करणारे पत्रक काढले असून उद्यापासून गोविंदा मंडळे सराव सुरु करतील, असे विनोद तावडे म्हणाले.