मुख्यमंत्री कोण होणार हे निवडणुकीनंतर ठरवू
By admin | Published: October 1, 2014 12:53 AM2014-10-01T00:53:40+5:302014-10-01T00:53:40+5:30
भारतीय जनता पक्ष १८० पेक्षा जास्त जागा जिंकून स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेवर येईल, असा विस्वास व्यक्त करतानाच निवडणुकीनंतरच आम्ही मुख्यमंत्री ठरवू , असे स्पष्ट प्रतिपादन पक्षाचे महाराष्ट्राचे
राजीव प्रताप रुडी : शिवसेनेच्या टीकेला उत्तर नाही
नागपूर : भारतीय जनता पक्ष १८० पेक्षा जास्त जागा जिंकून स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेवर येईल, असा विस्वास व्यक्त करतानाच निवडणुकीनंतरच आम्ही मुख्यमंत्री ठरवू , असे स्पष्ट प्रतिपादन पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
पूर्व विदर्भातील निवडणूक कामाचा आढावा घेण्यासाठी रुडी मंगळवारी नागपूरमध्ये आले होते. सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना निवडणुकीपूर्वी भाजप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून कुणालाही प्रोजेक्ट करणार नाही, असे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीनंतर ‘केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र’ अशा घोषणा राज्य भाजपच्यावतीने दिल्या जात होत्या. याकडे रुडी यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आमचे प्रथम लक्ष्य हे सत्ता स्थापन करण्याचे आहे. राज्यात पक्षाला १८० पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे. स्वबळावर सत्ता आल्यावर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय एकमताने घेतला जाईल.
शिवसेनेचे केंद्रातील मंत्री अनंत गीते राजीनामा देणार असल्याबद्दल रुडी यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, भाजपने शिवसेनेला राजीनामा देण्यास सांगितले नाही. हा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे त्यावर बोलणे उचित नाही. उद्धव ठाकरे यांनी एनडीएमधून बाहेर पडणार नाही हे सुद्धा सांगितले आहे. पण यावरही आपण काहीही बोलणार नाही. शिवसेनेने केलेल्या टीकेला भाजप उत्तर देणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात १५ वर्षापासून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आहे. त्यांची सत्ता उलथवून लावणे हे भाजपचे लक्ष्य आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर या पक्षांसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले.
शिवसेनेशी युती कायम राहावी यासाठी भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने त्याच बरोबर केंद्रीय नेतृत्वाने शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र सेना १५१ जागांवर अडून बसल्याने अखेर आम्हाला वेगळा मार्ग धरावा लागला. पक्ष राज्यात २५५ जागा लढवत असून उर्वरित ठिकाणी मित्रपक्षाला संधी देण्यात आली आहे. महायुतीतील सेना वगळता इतर सर्व घटक पक्ष आमच्या सोबत आहेत. आठवले यांना केंद्रात मंत्रिपद देण्याबाबत पक्षाची भूमिका सकारात्मक आहे. भाजपनेच त्यांना राज्यसभेवर पाठविले आहे, असे रुडी म्हणाले.
आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यात स्वतंत्र विदर्भाबाबतची पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल. केद्राकडून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न होत असल्याच्या कॉंग्रेसच्या आरोपालाही जाहीरनाम्यातून उत्तर दिले जाईल, असे रुडी म्हणाले. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचे त्यांनी समर्थन केले. वेळ कमी असल्याने जागा अधिक लढायच्या असल्याने हा प्रकार घडला. पण यापुढे काळजी घेतली जाईल, असे रूडी म्हणाले.
पत्रकार परिषदेला खासदार अजय संचेती, खासदार अशोक नेते,आमदार अनिल सोले, गिरीश व्यास, चंदन गोस्वामी उपस्थित होते.
मोदी महाराष्ट्र ढवळून काढणार; १० दिवसात २५ सभा
कुठल्याही परिस्थितीत पक्षाची महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता यावी यासाठी भारतीय जनता पक्ष संपूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरणार आहे. पक्षाचे स्टार प्रचारक व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० दिवसात तब्बल २२ ते २५ सभा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दसऱ्यानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजे ४ आॅक्टोबरपासून मोदींच्या सभांना सुरुवात होईल .१३ तारखेपर्यंत त्यांच्या राज्याच्या विविध भागात सभा होतील. एखाद्या राज्यात निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधानांच्या इतक्या संख्येत सभा आयोजित करण्याची कदाचित राजकीय इतिहासातील ही पहिली घटना असावी,असे रुडी म्हणाले. विदर्भात किती सभा होणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. फक्त मोदीच नव्हे तर मध्यप्रदेश, राजस्थान, गोवा आणि छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री, प्रमुख केंद्रीय मंत्री, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संघटनेतील केंद्रीय पदाधिकारी प्रचारात उतरणार आहेत. विदर्भासाठी संयोजक म्हणून राजीव प्रताप रुडी कोकण, ठाणे विभागासाठी अनंतकुमार यांच्याकडे तर उर्वरित महाराष्ट्राची जबाबदारी व्ही. सतीश यांच्याकडे देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राज्यात विविध क्षेत्रात वाढलेला भ्रष्टाचार, स्वच्छ प्रशासन हे पक्षाचे प्रचाराचे मुद्दे असतील, असे रुडी यांनी सांगितले.