एकनाथ खडसेंबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील- गिरीश महाजन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 05:47 PM2018-05-05T17:47:48+5:302018-05-05T17:47:48+5:30
मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. खडसे मंत्रीमंडळात आले तर आनंदच होईल.
पुणे - भाजपा नेते एकनाथ खडसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चीट दिली आहे. त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला असून न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांचा मंत्रीमंडळात येण्याचा मार्ग मोकळा होईल. मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील. खडसे मंत्रीमंडळात आले तर आनंदच होईल, असे वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी व्यक्त केले.
पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी खडसे यांच्या मंत्रीमंडळातील पुनरागमानाबाबत आपली भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, एसीबीने न्यायालयात अहवाल सादर केला आहे. त्यावर न्यायालयाचे समाधान झाले तर खडसेंचा मार्ग मोकळा होईल. त्यांना मंत्रीमंडळात घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांच्याकडे एक अनुभवी नेता म्हणून आम्ही पाहतो. विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी चांगले काम केले आहे. ते मंत्रीही राहिले असून प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. ते मंत्रीमंडळात आले तर त्याचा सरकार आणि पक्षालाही फायदा होईल. त्यांच्या अनुभवाची पक्षाला गरज आहे.
खडसे यांना क्लीनचीट मिळाल्याने विरोधकांकडून होणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. विरोधकांचे कामच ते आहे. त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नाही. छगन भुजबळ अनेक दिवस तुरूंगात होते. त्यांना आता जामीन मिळाला आहे. अद्याप हा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणार नाही. आघाडी सरकारच्या काळातच त्यांची चौकशी सुरू होती. त्यामुळे आमच्या सरकारने त्यांना आतही टाकले नाही आणि बाहेरही काढले नाही. सरकार सुडबुध्दीने वागत नाही. अजूनही काही घोटळ्यांची चौकशी सुरू आहे. चुका केलेल्यांवर कारवाई होणारच आहे, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
सतत मोर्चे योग्य नाही
शेतकरी संघटनांच्या ८० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. सध्या दुध उत्पादकांसमोर अडचणी आहेत. याबाबत चर्चेतून मार्ग काढला जाईल. पण सातत्याने आंदोलन, मोर्चे काढणे योग्य नाही. एक जूनच्या संपाबाबतही सोमवारी अजित नवले यांच्याशी चर्चा केली जाणार आहे, असे महाजन यांनी स्पष्ट केले. सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सरकार संवेदनशील असल्याने मोर्चे काढले की प्रश्न मार्गी लागतात. असे लोकांना वाटते, अशी टिपणीही त्यांनी केली.