महाराष्ट्र झाला हागणदारीमुक्त! मुख्यमंत्र्यांची घोषणा; ६० लाख शौचालये बांधली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 02:27 AM2018-04-19T02:27:24+5:302018-04-19T02:27:24+5:30
राज्यात ४ हजार कोटी रुपये खर्चून ६० लाखांपेक्षा अधिक शौचालयाचे बांधकाम केले असून महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
मुंबई : राज्यात ४ हजार कोटी रुपये खर्चून ६० लाखांपेक्षा अधिक शौचालयाचे बांधकाम केले असून महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार हागणदारीमुक्त महाष्ट्रासाठी जी बेसलाइन निश्चित केली होती; त्यानुसार
ग्रामीण महाराष्ट्रात २०१४ मध्ये ४५ टक्के शौचालये बांधलेली
होती. उर्वरित ५५ टक्के शौचालयांचे उद्दिष्टही आता पूर्ण करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील शहरी भाग यापूर्वीच हागणदारीमुक्त झाला आहे.
ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्यासाठीचे अभियान २
आॅक्टोबर २०१४ रोजी सुरू करण्यात आले. ते २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत
पूर्ण करायचे होते. त्याच्या एक
वर्ष आधीच अभियानाची पूर्तता करण्यात आली आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ
खोत, विभागाचे अपर मुख्य
सचिव शामलाल गोयल यांनी
स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
...तर पाण्याची व्यवस्था करणार
शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट एक वर्षआधीच ओलांडण्यात
आले. तरीही ग्रामीण भागात लोक उघड्यावर शौचास जात
आहेत याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की,
नागरिकांनी शौचालयांचा वापर करावा यासाठी जागृती केली
जात आहे. पाण्याच्या व्यवस्थेअभावी शौचालयांचा वापर होत
नसेल अशा ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न असेल.