वशिलेबाजीला मुख्यमंत्र्यांचा चाप
By admin | Published: February 2, 2017 12:22 AM2017-02-02T00:22:11+5:302017-02-02T00:22:11+5:30
महापलिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवार निश्चित करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले काही रात्री वर्षा बंगल्यावर बसून केले. हे करताना
- यदु जोशी, मुंबई
महापलिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवार निश्चित करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले काही रात्री वर्षा बंगल्यावर बसून केले. हे करताना त्यांनी स्वत: राबविलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून इलेक्टिव्ह मेरिट हा एकमेव निकष लावला आणि वशिलेबाजी भारी ठरणार नाही, याची दक्षतादेखील घेतली.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष/शहराध्यक्ष, स्थानिक आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्षांनी नियुक्त केलेले दोन वा तीन जण, महिला आणि दलित आघाडीच्या अध्यक्षांचा समावेश प्रत्येक जिल्ह्याच्या संसदीय मंडळामध्ये होता. या मंडळाने साधारणत: एक महिन्यापूर्वीच प्रदेशाकडे नावे पाठविली. एका जागेसाठी एकापेक्षा अधिक नावे अलीत अशा ठिकाणी उमेदवार निश्चित करताना तर मुख्यमंत्र्यांनी समांतर यंत्रणेचा आधार घेतलाच शिवाय ज्या ठिकाणी एकच उमेदवार दिलेला आहे तिथेही विविध निकष तपासलेले आहेत की नाहीत याची खातरजमा करवून घेतली.
मुख्यमंत्र्यांनी सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये दोन सर्वेक्षण खासगी एजन्सीकडून करवून घेतले. एक सर्वेक्षण हे कोणत्या पक्षाची काय परिस्थिती आहे हे दाखविणारा होता. दुसरे सर्वेक्षण हे भाजपाच्या संभाव्य उमेदवारांबाबतचे होते. उमेदवारांची अंतिम यादी तयार करताना स्थानिक मंत्री, आमदार, खासदारांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली तेव्हा हे दोन्ही सर्वेक्षणांचे अहवाल त्यांच्याजवळ होते. एखाद्या नेत्याने विशिष्ट नावाचा आग्रह धरला तर सर्वेक्षणामध्ये त्याची काय परिस्थिती आहे याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी तातडीने करून दिली. ‘तुम्ही सुचवता आहात त्यापेक्षा सरस उमेदवार तिथे आहे, तेव्हा त्याचा विचार प्रामुख्याने झाला पाहिजे’, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी गुणवत्तेला प्राधान्य दिले.