‘क्लस्टर’ लागू करण्यात मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा अडसर
By admin | Published: September 21, 2016 04:02 AM2016-09-21T04:02:30+5:302016-09-21T04:02:30+5:30
ठाणे जिल्ह्यात ८२ टक्के बांधकामे ही बेकायदा आहेत. क्लस्टर योजना लागू करण्याआधीच जास्तीचा एफएसआय वापरण्यात आला
कल्याण : ठाणे जिल्ह्यात ८२ टक्के बांधकामे ही बेकायदा आहेत. क्लस्टर योजना लागू करण्याआधीच जास्तीचा एफएसआय वापरण्यात आला आहे. आता जर विकास करायचा असेल, तर आठ एफएसआय द्यावा लागेल. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेकायदा बांधकामे नियमित करण्याची घोषणा ही पोकळ आणि अशक्यप्राय असल्याची टीका माजी पालकमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी कल्याण, कांबा येथील मेळाव्यांत केली.
या वेळी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार गोटीराम पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सारिका गायकवाड, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, कल्याण पश्चिमेचे अध्यक्ष संदीप देसले, नगरसेवक जव्वाद डोण, कुणाल पाटील, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, ग्रामीणचे नेते अर्जुन चौधरी, वंडार पाटील आदी उपस्थित होते.
नाईक म्हणाले की, ‘बांधकामे नियमित करण्याचा निर्णय एखादा ग्रामपंचायतीचा सरपंचही घेणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री असा निर्णय घेतात, हे हास्यास्पद आहे. भाजपाने केवळ थापा मारल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थापाडे आहेत. त्यांचाच कित्ता राज्याचे मुख्यमंत्री गिरवत आहेत. मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली आणि कोन ते दुर्गाडी या पुलांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले असले तरी त्याला मंजुरी आघाडी सरकारने दिली होती. आम्ही केलेल्या कामांची भूमिपूजने भाजपा करत आहे. पालकमंत्री असताना मी कामे केली नाहीत, असा भाजपाचा आरोप चुकीचा असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे सरकार ड्युप्लिकेट सरकार आहे.’
‘नवी मुंबई महापालिकेचा कारभार स्वच्छ आहे. ही महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे या महापालिकांत शिवसेनेची सत्ता आहे. त्याला भाजपाची साथ आहे. आमच्या पालिकेतील कारभाराची चौकशी करायची असेल, तर शिवसेना-भाजपाच्या ताब्यातील महापालिकांची अगोदर चौकशी करण्यात यावी आणि त्यासाठी एसआयटी नेमण्यात यावी. त्याचे आॅडिट करावे,’ या मागणीचा पुनरूच्चार नाईक यांनी केला.
>पंतप्रधान मोदींवर टीका
भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारत-पाकमध्ये एक लहानचे युद्ध घडवून आणतील. त्याचा वापर निवडणुकीत
करतील, असाही आरोप नाईक यांनी केला.