मुख्यमंत्र्यांची गुगली, युवानेत्यांची टोलेबाजी!

By admin | Published: April 4, 2016 03:07 AM2016-04-04T03:07:50+5:302016-04-04T03:07:50+5:30

एरव्ही पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातिवंत मुलाखतकाराच्या शैलीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम

Chief Minister's googly, mobilization of youth! | मुख्यमंत्र्यांची गुगली, युवानेत्यांची टोलेबाजी!

मुख्यमंत्र्यांची गुगली, युवानेत्यांची टोलेबाजी!

Next

मुंबई : एरव्ही पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातिवंत मुलाखतकाराच्या शैलीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि भाजपाच्या प्रवक्त्या शायना एन. सी. या युवानेत्यांवर प्रश्नांची गुगली टाकली, तर अपेक्षित प्रश्नांना सामोरे जाण्याची तयारी करूनच आलेल्या या युवानेत्यांनी तितकीच चमकदार उत्तरे देऊन, मुख्यमंत्र्यांचे चेंडू सीमापार टोलवले, तर काही प्रश्नांवर सावध उत्तरे देऊन आपली ‘विकेट’ वाचविली. मुख्यमंत्री आणि युवानेत्यांच्या या सवाल-जबाबाच्या जुगलबंदीने सभागृहात हशा, टाळ्यांची अक्षरश: बरसात झाली. मुख्यमंत्र्यांनीच अशी मुलाखत घेण्याची एकमेवाद्वितीय किमया घडली ती, ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द ईयर’ या सोहळ््यामुळे ! ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कारांच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी युवानेत्यांना बोलते केले. ‘मुलाखत देताना टेन्शन येते, पण मुलाखत घेताना किती टेन्शन येते, ते आज कळले,’ अशी टिप्पणी करत फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा ‘रोखठोक’ कार्यक्रम सुरू केला.
मुख्यमंत्री : प्रणिती, तू २००९ मध्ये निवडणूक लढवून आमदार झालीस. प्रारंभी काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री व आता माझी कारकीर्द पाहत आहेस. १९९९ पासून २०१३पर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांपैकी तुला आवडलेले मुख्यमंत्री कोण?
प्रणिती : मला आवडलेले सगळे मुख्यमंत्री १९९९ पूर्वीचे होते. मात्र, मी सगळ्या मुख्यमंत्र्यांकडे आदराने पाहते. सगळ्यांकडून शिकण्यासारखे खूप आहे. प्रत्येकाची कार्यशैली वेगवेगळी राहिली आहे. तुम्ही विरोधक आणि सत्ताधारी अशा दोन्ही भूमिका निभावल्या असून, तुमच्यापासूनही मला प्रेरणा मिळाली आहे! (हशा)
मुख्यमंत्री : शायना, तुमचे फॅशनच्या दुनियेत एवढे चांगले चालले होते, देशभरात तुमचे नाव आहे. असे असताना राजकारणात येण्याचे आपल्या डोक्यात कुठून आले? तुम्हाला मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे का?
शायना : भाजपा नेते नितीन गडकरी हे माझ्या वडिलांचे मित्र व माझे मॉडेल लीडर राहिले आहेत. माझ्या वडिलांचे अन्य पक्षांतही बरेच मित्र होते, पण मी भाजपात दाखल झाले. राहता राहिला प्रश्न महत्त्वाकांक्षेचा, तर मी रांगेत आहे. राजकारणात महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही. वेगवेगळ्या व्यावसायिकांनी राजकारणात आले पाहिजे, असे माझे मत आहे. नाहीतर ही काय केवळ मॉडेलना साडी नेसवते, अशी हेटाळणी केली जाते. राजकारण ही माझी पॅशन आहे. मी माझ्या राजकीय कारकिर्दीने लोकांना तोंडात बोटं घालायला भाग पाडणार.
मुख्यमंत्री : ‘सब्र का फल मिठा होता है!
(सभागृहात टाळ्यांचा कडकडाट)
मुख्यमंत्री : पंकजा, मंत्री म्हणून तुम्ही पॅशिनेट आहात. एखादे काम झाले नाही, तर तुम्ही अस्वस्थ होता. तुमचे पती अमित आणि मुलगा आर्यन तुमचा हा स्वभाव कसा काय सहन करतात?
पंकजा : घरी माझा जो स्वभाव आहे, त्याच्या एकदम विपरित बाहेर आहे. घरी आपण प्रत्येक गोष्ट भावनिक पातळीवर हाताळतो, तर घराबाहेर प्रत्येक गोष्टीचा व्यावहारिक पातळीवरून सामना करतो. मंत्री म्हणून मी स्वत:ची नव्हे, तर लोकांची
कामे करते व प्रत्येक कामाचा पाठपुरावा करते. त्यामुळे एखादे काम झाले नाही, तर अस्वस्थ होते. मी घरी उत्तम स्वयंपाक करते. तुम्हाला
वरचेवर जेवायला येण्याचे निमंत्रण
देत आहे, पण तुम्हाला वेळच
नाही. असो, पाठपुरावा करून काम तडीला न्यायचे, या विचारांच्या
मुशीत माझी वाढ झाल्याने मी अशी वागते.
मुख्यमंत्री : प्रणिती, आमदार होण्यापूर्वीचे आयुष्य आणि आताचे आयुष्य यात काय फरक झाला, तू काय गमावलं असं वाटतंय?
प्रणिती : स्वातंत्र्य! आमदार झाल्याने लोक ओळखू लागले आहेत. जबाबदारी वाढली आहे. मी सोलापूरकर असले, तरी शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत वाढले आहे. येथील मुक्त जीवनाचा आनंद घेतला आहे. मात्र, आता कुणाबरोबर फोटो काढून घेतानाही दहा वेळा विचार करावा लागतो. फेसबुकवर काही कटू
अनुभव मी घेतले आहेत. राजकारणातील लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
मुख्यमंत्री : शायना, तुम्ही एक प्रोफेशनल आहात. फॅशन डिझायनर म्हणून तुम्ही चांगले काम करताच, पण तळागाळातील प्रश्नांकरिताही तुम्ही काम करता. त्याच वेळी पेज थ्रीवर झळकणाऱ्या राजकीय नेत्या अशी तुमची ओळख आहे. हा समतोल कसा सांभाळता?
शायना : स्त्री कुठल्याही क्षेत्रात असली, तरी तिला बहुविध व्यवधाने राखावी लागतात. पुरुष राजकीय नेत्यांनी कधी तरी आमच्या जागी येऊन आम्हाला किती वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो, ते जाणून घ्यावे. माझे पती हे माझे पाठीराखे आहेत. त्यांनी मला दिलेला विश्वास मला फॅशन डिझायनिंग आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत वावरण्याचे बळ देतो. मी ‘पेज थ्री’वरून ‘पेज वन’वर येण्याचा हळूहळू प्रयत्न करीत आहे.
मुख्यमंत्री : ‘पेज वन’वर जरी तुम्ही नसलात, तरी ‘प्राइम टाइम’ला वाहिन्यांवर रोज दिसता! (हशा)
शायना : आपल्याला वाचवण्याकरिता आम्हाला ते करावे लागते. आपण काही बोललात, तर बाहेर माझी आपल्याला सांभाळण्याकरिता धावपळ होते.
मुख्यमंत्री : पण बऱ्याचदा आम्ही काय बोललो आहोत, ते माहीत नसतानाही तुम्ही आम्हाला सांभाळायला पुढे सरसावता! (सभागृहात हशा आणि टाळ्या)
मुख्यमंत्री : पंकजा, मंत्री या नात्याने तुम्ही असा कोणता महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे की, जो महाराष्ट्रातील लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकेल?
पंकजा : गेली १० वर्षे पाण्याच्या विषयात काम करणे, ही माझी महत्त्वाकांक्षा राहिली आहे. आमदार होते, तेव्हाही मी याच विषयावर काम करायचे. आपण जलसंधारण खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली व माझे आवडते खाते मला दिले. या कामावर मी समाधानी असून, ‘जलयुक्त शिवार’ ही सरकारची योजना चोख राबवली गेली, तर तीन वर्षांत जनता समाधानी होईल.
मुख्यमंत्री : विश्वजित, विरोधी पक्षात असले म्हणजे विरोधच केला पाहिजे, अशी सर्वसाधारण भावना असते. राजकारणातील ‘जनरेशन नेक्स्ट’ यामध्ये परिवर्तन घडवू शकत नाही का? राज्य आणि देशासमोरील प्रश्नांवर एकमत करू शकत नाही का?
विश्वजित : विरोधाला विरोध करणे, हे तत्त्वत: मला पटत नाही. विचारांचा व प्रसंगानुरूप विरोध काही बाबतीत राहणार. मात्र, दुष्काळ व शहरी-ग्रामीण प्रश्नांकरिता एकत्र आले पाहिजे. देशाचे व राज्याचे भले होणार असेल, तर पक्षाच्या पलीकडे जाऊन हातमिळवणी केली पाहिजे.
मुख्यमंत्री : विधिमंडळातील तरुण
आमदारांच्या ‘युथ फोरम’ने यापूर्वीही
काही प्रश्न तडीस नेले आहेत. राज्याच्या प्रश्नावर आपण साऱ्यांनी एकमत केले, तर भविष्यात तुमच्या साऱ्यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतिपथावर राहील, असा मला विश्वास आहे. (विशेष प्रतिनिधी)
>विश्वजित कदम यांना आॅफर!
मुख्यमंत्री : विश्वजित, तुमचे
वडील पतंगराव मोठे नेते आहेत. त्यांच्यासोबत राहूनही तुम्ही स्वत:ची ओळख निर्माण केली. मात्र, पतंगरावांना तुम्ही ‘मेरा नंबर कब आयेगा’ हे कधी विचारणार? विश्वजित : पुढच्या वेळी
माझा नंबर नक्की असणार आहे.
मुख्यमंत्री : हा सल्ला मागील निवडणुकीच्या वेळी मी याला दिला होता. मात्र, त्याने तो ऐकला नाही, खरं की नाही?
विश्वजित : मी ऐकला, पण
वडिलांनी ऐकला नाही!
(सभागृहात जोरदार हास्यस्फोट)
मुख्यमंत्री : तुमच्या वडिलांना
कुणी समजावेल, हे शक्य नाही,
पण आमची तुम्हाला आॅफर आहे!

Web Title: Chief Minister's googly, mobilization of youth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.