मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील
By admin | Published: October 8, 2016 02:59 AM2016-10-08T02:59:47+5:302016-10-08T02:59:47+5:30
ओमी कलानी आणि त्यांच्या टीमला प्रवेश देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे.
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये भाजपाची ताकद वाढवण्यासाठी ओमी कलानी आणि त्यांच्या टीमला प्रवेश देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. पक्षात येणाऱ्या कोणाचेही स्वागत आहे, असे सांगत त्यांनी या प्रवेशाला संमती दिली.
राष्ट्रवादीतून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या समावेशाला मुख्यमंत्र्यांनी संमती दिल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दिली. भाजपाच्या शिष्टमंडळाने गुरूवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तेव्हा प्रवेशाचा मुद्दा मार्गी लागला. उल्हासनगरमध्ये निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी शहर विकासाचे कोणते मुद्दे मार्गी लागायला हवेत याबद्दलच्या अपेक्षा, मागण्याही शिष्टमंडळांना मुख्यमंत्र्यांच्या कानी घातल्या.
उल्हासनगर महापालिकेत सत्ता हवी असेल तर ओमी कलानी टीमला प्रवेश द्यायला हवा, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केल्यापासून ही टीम पक्षात नेमकी कधी प्रवेश करणार याबाबत अटकळ बांधली जात आहे. सध्या ओमी मुंबईत असल्याने ते मुख्यमंत्र्यांना भेटतील, असेही सांगितले जात आहे.
माजी शहर जिल्हाध्यक्ष महेश सुखरामानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्या गटाने ओमी कलानीच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढून सत्ता भाजपाच्या हाती येईल, असे निवेदन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दिले. तर सध्याचे शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी सुरूवातीला कलानी यांच्या प्रवेशाला अनुकूलता दर्शवली. नंतर मात्र त्यांनी पक्षाचा निर्णय मान्य असेल असे सांगत थेट भूमिका मांडली नाही.
शहर भाजपाच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अंबरनाथ-कल्याण रस्ता रूंदीकरणबाधित व्यापाऱ्यांच्या समस्या सांगितल्या. तसेच विकास कामांबाबत निवेदन दिले आहे.
या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, पक्ष प्रवक्त्या श्वेता शालिनी, शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, माजी शहर जिल्हाध्यक्ष महेश सुखरामानी, युवा अध्यक्ष सुनील राणा, युवा नेता संजय सिंग आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादीसह अन्य नगरसेवकांना प्रवेश देण्याचे संकेत शिष्टमंडळाला दिले. (प्रतिनिधी)
>पक्षाची ताकद वाढवणार
उल्हासनगर मनपा निवडणुकीत भाजपाची ताकद वाढावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इतर नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यांच्या आदेशाचे पालन आम्ही करणार आहोत.
- कुमार आयलानी, शहर जिल्हाध्यक्ष