मान्यवरांच्या थेट प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांची दिलखुलास टोलेबाजी
By admin | Published: April 5, 2016 02:29 AM2016-04-05T02:29:39+5:302016-04-05T02:29:39+5:30
स्वतंत्र विदर्भापासून मॉडेलिंगपर्यंत आणि घटवलेल्या स्वत:च्या वजनापासून ते वर्षभर न्यायालये सुरू ठेवण्याच्या मागणीपर्यंत अनेक प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी
मुंबई : स्वतंत्र विदर्भापासून मॉडेलिंगपर्यंत आणि घटवलेल्या स्वत:च्या वजनापासून ते वर्षभर न्यायालये सुरू ठेवण्याच्या मागणीपर्यंत अनेक प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ‘विराट’ टोलेबाजी केली. स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता श्रीहरी अणे यांना वकील नेमतो, असे सूचक उद्गार काढतानाच मूळ प्रश्नावर भाष्य करण्याचे शिताफीने टाळले. तर पोलिसांना घरे देण्याची अभिनेते नाना पाटेकर यांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ दी ईयर’ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यवरांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. प्रश्न विचारण्याकरिता ख्यातनाम विधिज्ञ उज्ज्वल निकम उभे राहिले. त्यावर, लागलीच फडणवीस यांनी, ‘निकम, मी सरकारी पक्षाचा विटनेस आहे. माझीच उलटतपासणी घेऊ नका’, असे उद्गार काढताच सभागृहात हास्याची लकेर उठली. त्यावर, निकम यांनीही, ‘मी तुमचा वकील असलो तरी ‘लोकमत’ने मला तुमची उलटतपासणी घ्यायला सांगितले आहे,’ असे प्रतिपादन केले.
‘तुमच्या जवळची मंडळी वेगळ्या विदर्भाची मागणी करू लागतात, तेव्हा मुख्यमंत्री या नात्याने तुमची काय भावना होते आणि अशा वेळी तुम्ही मानसिक शांतता कशी राखता,’ असा मार्मिक सवाल निकम यांनी केला. त्यावर, मुख्यमंत्री हसून म्हणाले की, ‘उलटतपासणीच्या वेळी मला वकील नेमता येत असेल, तर श्रीहरी अणे यांनाच मी वकील नेमतो! राहता राहिला प्रश्न मन शांत राखण्याचा, तर राजकारणात या कानाने ऐकून त्या कानाने सोडण्याखेरीज दुसरा पर्याय नाही!’ अलीकडेच राज्याचे अॅडव्होकेट जनरलपद सोडलेले श्रीहरी अणे हे प्रश्नकर्ते या नात्याने मुख्यमंत्र्यांपुढे उभे ठाकले. ‘अॅडव्होकेट जनरल या नात्याने काम करताना राज्य सरकार हा सर्वात मोठा वादी असल्याचे दिसून आले. सरकारने वायफळ खटले लढवण्यात वेळ खर्च करण्यापेक्षा हा प्रश्न सोडवाल का? असा सवाल असे अणे यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘सरकारचे खटले कमी झाले तर न्यायालयावरील ताण कमी होईल, हे खरे आहे. त्याकरिता, एखादा फोरम तयार करून, हे खटले कसे तडजोडीने सोडवता येतील, ते पाहिले जाईल.
देशातील एकाही व्यक्तीवर भीक मागून जगण्याची वेळ येणार नाही, याकरिता काही करणे शक्य आहे का,’ असा सवाल नारायण अगरवाल यांनी केला. त्यावर, मुख्यमंत्री म्हणाले की, ‘सरकारच्या भरवशावर राहून हे होणार नाही. समाजाने हे ठरवले तर अवघ्या पाच दिवसांत भिकारी दिसणे बंद होईल.’
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आर्थिक लाभाच्या बाबतीत मराठी कलाकारांवर होणाऱ्या अन्यायाचा मुद्दा अधोरेखित करणारा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर, ते म्हणाले की,‘मराठी कलावंत गुणवत्तेच्या बाबतीत उजवे असतातच. मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीने भारतीय सिनेमाला जेवढे दिले, तेवढे अन्य कुणी दिलेले नाही. सरकारने यावर लक्ष दिलेले नाही. थकीत अनुदानाचा प्रश्न मला माहीत आहे. मराठी चित्रपटसृष्टीकरिता जेवढे काही करता येईल, तेवढे करण्याचा शब्द देतो.’
>मुख्यमंत्र्यांना बॉलीवूडची आॅफर!
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी २०१४ मध्ये मॉडेलच्या पोजमधील फडणवीस यांचे काही फोटो पाहिल्याची आठवण करून देत ‘बॉलिवूडने संधी दिली तर भूमिका साकारणार का,’ अशी चक्क आॅफर दिली! त्यावर ‘मॉडेलिंगचा तो केवळ अपघात होता.२००४ मध्ये केंद्रातील सत्ता गेल्यावर विवेक रानडे यांनी विविध पोझमधील फोटो काढून ते मॉडेल म्हणून सर्वत्र होर्डिंग्जवर लावले. राष्ट्रीय मीडियाने बातम्या केल्या. अटलजींनी माझा उल्लेख ‘मॉडेल आमदार’ असा केला. मात्र, माणसाला कुत्रा चावला तर ती बातमी नाही. परंतु, माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी आहे. पण, रोजच माणूस कुत्र्याला चावायला लागला तर ती जशी बातमी होणार नाही, त्याचप्रमाणे मी मॉडेल म्हणून काम स्वीकारले तर त्याचे बातमीमूल्य राहणार नाही.’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मधूरची आॅफर विनम्रपणे नाकारली.