मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड
By admin | Published: May 23, 2015 01:52 AM2015-05-23T01:52:59+5:302015-05-23T01:52:59+5:30
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी सहकारी तीन मंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरने आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परतीच्या प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला.
नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी सहकारी तीन मंत्र्यांसोबत हेलिकॉप्टरने आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परतीच्या प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. मात्र हेलिकॉप्टरमधील प्रवाशांची संख्या कमी करण्याबरोबरच त्याची अनेकवार चाचणी घेतल्यानंतर मुख्यमंत्री कोल्हापूरकडे सुखरूप रवाना झाले.
शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता दिंडोरी रोडवरील एका शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे शासकीय हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री पदवीदान समारंभासाठी रवाना झाले. दुपारी साडेतीन वाजता मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी मंत्री कोल्हापुरला जाण्यासाठी दिंडोरी रोडवरील परेड मैदानावरील हेलिकॉप्टरमध्ये बसले. मात्र जमिनीपासून काही फूट उड्डाण केलेले हेलिकॉप्टर अचानक पुन्हा उतरविण्यात आले. त्यामुळे आधी मुख्यमंत्र्यांचे स्वीय साहाय्यक सुमित वानखेडे यांना खाली उतरविण्यात आले. त्यानंतर जलसंपदामंत्री महाजन यांना उतरविल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टरचे उड्डाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर ते यशस्वी ठरले.
ओझरच्या हवाई वाहतूक नियंत्रकांनी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर चालकाशी संपर्क साधून तांत्रिक बिघाडाबाबत माहिती घेतली असता, त्यांनी ‘ओके’ असल्याचा निर्वाळा दिल्यावर प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. (प्रतिनिधी)
आधी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक सुमित वानखेडे यांना खाली उतरविण्यात आले. त्यानंतर जलसंपदा मंत्री महाजन यांना उतरविल्यानंतर पुन्हा हेलिकॉप्टरचे उड्डाण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर ते यशस्वी ठरले.