मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ हेलीकॉप्टर बिघडले होते साताऱ्यातही!
By admin | Published: May 25, 2017 11:13 PM2017-05-25T23:13:37+5:302017-05-25T23:13:37+5:30
मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ हेलीकॉप्टर बिघडले होते साताऱ्यातही!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : लातूर येथे अपघात झालेले हेच हेलीकॉप्टर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन साताऱ्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्यावेळीही बिघडले होते. मात्र तात्पुरती दुरूस्ती करून पुन्हा या हेलीकॉप्टरने टेकआॅफ घेतले. त्याचवेळी या बिघडलेल्या हेलीकॉप्टरच्या बाबतीत संबंधित प्रशासनाने सतर्कता बाळगली असतीतर निलंग्यातील घटना घडली नसती, अशीही चर्चा जिल्ह्यात रंगली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरूवार दि. १८ रोजी हेलीकॉप्टरने साताऱ्यात आले होते. नेहमी सैनिक स्कूलच्या पटांगणावर उतरणारे हे हेलीकॉप्टर पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानंतर प्रथमच पोलिस परेड ग्राऊंडवर उतरविले गेले. कारण सैनिक स्कूल पटांगणावरील हेलिपॅडला आजूबाजूच्या वस्तंूचा अडथळा होऊ शकतो, हे पोलिस खात्याने ओळखले होते. शुक्रवारी सकाळी पायलटने हेलीकॉप्टरची तपासणी केली असता त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. सुमारे पाच ते सहा वेळा हेलिकॉप्टर दुरूस्त करण्यासाठी सुरूही करण्यात आले होते. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने दुरूस्ती करण्याचे कामकाज सुरू झाले. दरम्यान कालावधीत मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारने सातारा जिल्ह्याचा उर्वरित दौरा केला.
दुपारी दुरूस्त झाल्यानंतरच हेलीकॉप्टर सांगलीकडे रवाना झाले होते. मात्र हेलीकॉप्टरने टेकआॅफ घेतल्यानंतर सर्वजण चिंतेत होते. मुख्यमंत्री सांगलीत पोहोचेपर्यंत पोलिस यंत्रणा त्यांच्या टीमशी संपर्क ठेवून होती. सायंकाळी मुख्यमंत्री सांगलीत पोहोचल्यानंतर सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला होता.
जिल्ह्यातील हितचिंतकांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद
निलंगा येथील घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हितचिंतक अतुलबाबा भोसले तसेच दीपक पवार यांनी तत्काळ त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र, मुख्यमंत्र्यांचा मोबाईल दुर्घटनाग्रस्त हेलीकॉप्टरमध्ये हरवल्यामुळे त्यांच्या स्वीय सहायकाच्या मोबाईलवरुन त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.