मुख्यमंत्र्यांचे ‘जय जवान, जय किसान’, गडचिरोलीत पोलिसांसोबत तर मुंबईत शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 06:11 AM2022-10-26T06:11:29+5:302022-10-26T06:12:13+5:30
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी संध्याकाळी वर्षा या शासकीय निवासस्थानी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केेली
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच दिवशी सकाळी गडचिरोली येथे जाऊन आदिवासी बांधव आणि पोलिसांसोबत तर संध्याकाळी मुंबईत येऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. एकाच दिवसात मुख्यमंत्र्यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा कृतीतून दाखवून दिला.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी संध्याकाळी वर्षा या शासकीय निवासस्थानी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केेली. प्रत्येक जिल्ह्यातील ३ ते ४ प्रातिनिधिक शेतकरी या सोहळ्यास सपत्नीक उपस्थित होते. वर्षा निवासस्थानी शेतकऱ्यांना बोलावून दिवाळी साजरी करणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी लताताई, तसेच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली असे संपूर्ण कुटुंब या सोहळ्यात सहभागी झाले होते. लताताई आणि वृषाली यांनी शेतकऱ्यांचे औक्षण केले आणि भेटवस्तू दिल्या.
मुख्यमंत्री म्हणाले...
- हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी कृती विकास आराखडा तयार केला जात आहे.
- नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे होणारे नुकसान लक्षात घेऊन पूरक जोडधंदा कसा देता येईल, यावर अधिकारी काम करीत आहेत. कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देऊ.
- अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन आम्ही नियम बाजूला ठेवून दुप्पट मदत दिली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही भरपाई द्यायची आहे.
गडचिरोलीतील पोलिसांसोबत फराळ
भामरागड (जि. गडचिरोली) : मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त आणि दुर्गम धोडराज पोलीस मदत केंद्राच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले, तसेच आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी करीत त्यांना भेटवस्तू आणि फराळाचे वाटप केले.
दुर्गम, आदिवासीबहुल भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्षलवाद हा अडसर ठरत आहे. त्यामुळे या भागाच्या संपूर्ण विकासासाठी नक्षलवाद संपवणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस दल सक्षम आहे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री