मुख्यमंत्री कार्यालयानेच थांबवला ‘तो’ चेक, शहा ट्रस्टचा खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 04:25 AM2017-12-02T04:25:46+5:302017-12-02T04:25:53+5:30
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नाशिकच्या कांताबेन रसिकलाल शहा ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात आलेला ५१ लाख रूपयांचा धनादेश थांबवावा, अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्या होत्या, असे समोर आले आहे.
मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नाशिकच्या कांताबेन रसिकलाल शहा ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात आलेला ५१ लाख रूपयांचा धनादेश थांबवावा, अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाने दिल्या होत्या, असे समोर आले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणारे धनादेश खात्यात पैसे नाहीत म्हणून बाउन्स झाल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. मुख्यमंत्री कार्यालयाने खुलासाही केला होता की, कांताबेन ट्रस्टचा धनादेश स्टॉप पेमेंट करण्यात आला असला तरी त्यांनी ४३ आणि ८ लाख असे दोन धनादेश नंतर दिले. ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झाले, असा खुलासा करण्यात आला होता. अपरिहार्य कारणास्तव आपणास कळवण्याचे आदेश आहेत की सदर धनादेशाचे पेमेंट स्टॉप करण्यात यावे व त्या ऐवजी सदर रकमेचा धनादेश पुन्हा देण्यात यावा अथवा तेवढी रक्कम आरटीजीएस अथवा एनईएफटीद्वारे भरण्यात यावी व तसे मुख्यमंत्री कार्यालयास कळवावे, मुख्यमंत्री कार्यालयाने कळविले होते. त्यामुळे ट्रस्टने स्टॉप पेमेंटच्या सूचना बँकेत दिल्या आणि नंतर दोन वेगळे धनादेश मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवून दिले, अशी माहिती ट्रस्टने लोकमतला दिली.