मुख्यमंत्र्यांच्या चहात विरोधकही वाटेकरी - सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 05:02 AM2018-04-02T05:02:42+5:302018-04-02T05:02:42+5:30
पाहुणचार करणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. मात्र संस्कृती विसरलेल्या लोकांनी आता पाहुणचाराला घोटाळ््याचे नाव दिले आहे. विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांकडील चहाचा आस्वाद घेतला होता, हे विसरू नये, अशी टीका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे केली.
सांगली - पाहुणचार करणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. मात्र संस्कृती विसरलेल्या लोकांनी आता पाहुणचाराला घोटाळ््याचे नाव दिले आहे. विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांकडील चहाचा आस्वाद घेतला होता, हे विसरू नये, अशी टीका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे केली.
देशमुख म्हणाले की, विरोधकांचे राजकारण अत्यंत केविलवाणे वाटत आहे. कधी उंदीर घोटाळा, तर कधी चहा घोटाळा म्हणून ते भुई थोपटत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे चहा घेणाऱ्यांमध्ये विरोधी पक्षनेते व त्यांच्या पक्षाचे सदस्यही असतात.
विरोधकांकडे आता केवळ आघाडीचाच मार्ग उरलेला आहे. भाजपाच्या ताकदीपुढे ते टिकत नाहीत. जनता त्यांना साथ देत नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे, असे त्यांनी सांगितले.
डल्ला मारणारेच हल्लाबोल करताहेत
राष्ट्रवादीवाले केवळ निवडून येणा-या व त्यांच्या व्याख्येतील ताकदवान लोकांनाच जवळ करतात. आजवर प्रत्येक गोष्टीवर डल्ला मारून मोठे झालेले लोक आता हल्लाबोल करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
जिल्हा बँकांनीही सवलत द्यावी!
एकरकमी परतफेड योजनेसाठी शासनाने तीन महिने मुदतवाढ दिली आहे. दीड लाखापर्यंतची सवलत शासन देत असताना जिल्हा बँका व अन्य बँकांनीही कर्जदारांना थोडी वाढीव सवलत द्यावी, असे आवाहन देशमुख यांनी केले.