डीआरपीच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक
By admin | Published: June 16, 2016 03:11 AM2016-06-16T03:11:43+5:302016-06-16T03:11:43+5:30
धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सेक्टर एकमधील इमारती आणि चाळीतील रहिवाशांना ७५० चौरस फुट घर देण्यासह वगळण्यात आलेल्या झोपड्यांना प्रकल्पात सामावून घेण्याच्या मागण्यांबाबत
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सेक्टर एकमधील इमारती आणि चाळीतील रहिवाशांना ७५० चौरस फुट घर देण्यासह वगळण्यात आलेल्या झोपड्यांना प्रकल्पात सामावून घेण्याच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत, अशी माहिती आंदोलक धारावीकरांकडून देण्यात आली.
रहिवाशांना ४०५ चौरस फुटांचे घर देण्यात येणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परंतु रहिवाशांना ते मान्य नाही. परिणामी तीव्र आंदोलन करण्यात आले. याचा भाग म्हणून १४ जून रोजी डीआरपी सेक्टर एक रहिवासी संघाच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी येथील रहिशांना डीआरपी प्रकल्पात ७५० चौरस फुटांचे घर मिळण्याबाबतची मागणी संघाने कायम ठेवली. शिवाय हार्बर रेल्वे लगतच्या वगळण्यात आलेल्या झोपड्यांना डीआरपीत सामावून घ्यावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी लावून धरली.
आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी धारावीकरांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक असून, याबाबत लोकहिताचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.