बळीराजा संघटनेतर्फे मुख्यमंंत्र्यांचा निषेध
By admin | Published: November 26, 2014 10:36 PM2014-11-26T22:36:21+5:302014-11-27T00:24:41+5:30
भेट नाकारली : नजरकैदेत ठेवल्याचा आरोप
कऱ्हाड : ‘ऊसदरासह शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने काळे झेंडे दाखविण्याचे आम्ही जाहीर केले होते़ त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मला नजरकैदेत ठेवले़ दरम्यान प्रशासनाने मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चेसाठी दहा मिनिटे वेळ देतो, असे सांगितले़ मात्र मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आम्हाला वेळ दिला नाही़ त्यामुळे आम्ही प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध केला आहे,’ अशी माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील यांनी मंगळवारी दिली़
मुख्यमंत्री मंगळवारी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त कऱ्हाडच्या दौऱ्यावर होते़ त्यावेळी बळीराजा संघटनेच्या वतीने पंजाबराव पाटील व त्यांचे सहकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काळे झेंडे दाखविणार होते़ त्याची माहिती देताना पाटील म्हणाले, ‘पोलिसांना आमच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मला नजरकैदेत ठेवले़ त्यानंतर प्रशासनाच्या वतीने मला विमानतळावर दहा मिनिटे मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन देण्यात आले़ मुख्यमंत्री विमानतळावर आल्यावर आम्ही त्यांना भेटलो; मात्र चर्चा झाली नाही़ आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे़ त्यात उसाच्या पहिल्या हप्त्याचा तोडगा तातडीने काढावा, शेतकऱ्यांना शेतीपंपाला दिवसा बारा तास वीजपुरवठा करावा, शेतीसाठी मजूर मिळत नसताना रोजगार हमीतील कामांसाठी मजुरांची घातलेली अट शिथील करून यंत्रणा वापरून कामे करण्यास परवानगी द्यावी, शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़’ (प्रतिनिधी)