मुख्यमंत्र्यांचा ‘प्रकल्प’ वर्षाव!

By Admin | Published: May 17, 2016 05:21 AM2016-05-17T05:21:49+5:302016-05-17T05:21:49+5:30

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार येत्या काही दिवसांत दोन वर्षे पूर्ण करीत आहे.

Chief Minister's project 'rain'! | मुख्यमंत्र्यांचा ‘प्रकल्प’ वर्षाव!

मुख्यमंत्र्यांचा ‘प्रकल्प’ वर्षाव!

googlenewsNext


मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार येत्या काही दिवसांत दोन वर्षे पूर्ण करीत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रसायन व खते मंत्री अनंतकुमार, राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रकल्पांची घोषणा केली.
देशभरात तीन ठिकाणी राष्ट्रीय औषध निर्माणशास्त्र शिक्षण व संशोधन संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर) उभारण्यात येणार असून, त्यातील एक नागपुरात उभारली जाणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणारी साधने देशातच निर्माण व्हावीत, यासाठी नागपूर येथे मेडिकल डिव्हाईस पार्क उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी हृदयविकारात लागणाऱ्या स्टेंटपासून सर्व साहित्याची निर्मिती होणार आहे. त्यामुळे स्वस्त व स्वदेशी साहित्य मिळू शकेल, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
थळ (जि. रायगड) येथील राष्ट्रीय केमिकल अ‍ॅण्ड फर्टिलायझरच्या थळ प्रकल्पातील तिसरे युनिट सुरू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पात केंद्र शासन सहा हजार कोटी रु पयांची गुंतवणूक करणार असून, त्यामध्ये १३ लाख टन युरिया खताची निर्मिती होणार आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला दोन लाख टन अतिरिक्त युरियाचा पुरवठा करेल, असे अनंतकुमार यांनी सांगितले.
पुणे, जळगावमध्ये सीआयपीईटी
प्लॅस्टिक अभियांत्रिकी क्षेत्रातील कुशल अभियंत्यांची गरज भागविण्यासाठी औरंगाबाद व चंद्रपूर येथे केंद्रीय प्लॅस्टिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्था (सीआयपीईटी) उभारण्यात येणार आहे. त्यातील औरंगाबाद येथे सध्या चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही क्षमता वाढवून सहा हजार करण्यात येणार आहे. पुणे, जळगावच्या केंद्रासाठी आणि चंद्रपूरच्या विस्तारासाठी राज्य शासन जागा देईल.
जळगावमध्ये प्लॅस्टिक पार्क
जळगाव येथे प्लॅस्टिक पार्क उभारण्यासही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. १०० एकरामध्ये उभारण्यात येणाऱ्या या पार्कमध्ये सुमारे एक लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. सुमारे एक हजार कोटी रु पयांची ही गुंतवणूक होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
औरंगाबादमध्ये बल्क ड्रग पार्क
औषध उत्पादनात देश स्वयंपूर्ण व्हावा म्हणून गुजरात, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रात बल्क ड्रग पार्क उभारण्याचा निर्णय केंद्राने घेतला असून, औरंगाबाद येथे हा पार्कउभारण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
१०० जेनरिक मेडिसिन केंद्रे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात या वर्षात तीन हजार जनऔषधी केंद्रे सुरू करण्याचे घोषित केले आहे. त्यातील शंभर जनऔषधी केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहेत. यासंदर्भात लवकरच राज्य व केंद्र शासन यांच्यात करार करण्यात येणार आहे. या केंद्रांमध्ये सुमारे ६०० औषधे आणि १५० प्रकारचे वैद्यकीय साहित्य स्वस्तात मिळेल.
हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या
पुणे प्रकल्पाचे पुनरुज्जीवन
सध्या बंद असलेल्या पुणे येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या औषध निर्माण प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. त्यसाठीचा निधी केंद्र सरकार देणार आहे. या पुनरुज्जीवनाबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर येत्या १५ दिवसांत मान्यतेसाठी येईल, असे अनंतकुमार यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Chief Minister's project 'rain'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.