मुख्यमंत्र्यांची मराठवाड्यात शिवारफेरी
By admin | Published: September 5, 2015 01:20 AM2015-09-05T01:20:43+5:302015-09-05T01:20:43+5:30
मागेल त्याला शेततळे अन् आॅगस्टमध्ये चारा छावणी सुरू केल्याचा 'क्रांतिकारी' निर्णय सांगत कुठल्याही ठोस निर्णयाविना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाड्याच्या दुष्काळी भागातील
मराठवाडा वर्तमान धर्मराज हल्लाळे
मागेल त्याला शेततळे अन् आॅगस्टमध्ये चारा छावणी सुरू केल्याचा 'क्रांतिकारी' निर्णय सांगत कुठल्याही ठोस निर्णयाविना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाड्याच्या दुष्काळी भागातील तीन दिवसांचा दौरा जणू शिवारफेरीच ठरला़ आता पाहणी झाली, आराखडे तयार आहेत़ लवकरच निर्णय घेऊ, एवढाच काय तो शाब्दिक दिलासा दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाला़
चारा छावणीची अट शिथिल करून १५ लाखांची ठेवमर्यादा ५ लाखांवर आणली़ ५०० ऐवजी २५० जनावरे असली तरी छावणी सुरू होईल, एवढेच नाहीतर गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच आॅगस्टमध्ये चारा छावणी सुरू करण्याचा क्रांतिकारी निर्णय आमच्या सरकारने घेतला, असे मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितले़ त्याचवेळी गेल्या कित्येक वर्षांत आज इतकी भीषण परिस्थिती उद्भवली नव्हती, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे़
मराठवाड्यात आजघडीला ८१२ गावांमध्ये १२१६ टँकर सुरू आहेत़ लातूर व जालना शहराला १५ दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो़ परभणीला १० ते १२ दिवसाआड, उस्मानाबाद, बीडला ८ दिवसाआड तर नांदेड, हिंगोलीला तीन-चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो़ ग्रामीण भागाचा तर भरपावसाळ्यातच टँकरवाडा झाला आहे़ जिल्ह्याची ठिकाणे असलेल्या शहरांवर पेयजलाचे संकट आहे़ अशावेळी मराठवाड्यातील पाण्याच्या टँकरसाठी ८० कोटींची तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले़ प्रत्यक्षात जिल्हा शहरे असलेल्या ठिकाणी पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करावे लागणार आहे़ एकूण लोकसंख्या, प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी, नजीकच्या प्रकल्पातील उपलब्धता व इतर आपत्कालीन उपाययोजना जाहीर करून जनतेला दिलासा द्यावा लागणार आहे़
लातूरला रेल्वेने पाणी देण्याचे नियोजन केले आहे़ त्याच धर्तीवर संपूर्ण मराठवाड्यातील मोठ्या शहरांमध्ये भविष्यात उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेवून रेल्वे मार्गाचा उपयोग करून वा अन्य मार्गाने पाणी कोठून व कसे आणता येईल, याचे नियोजन करण्याचे निर्देश त्या-त्या जिल्ह्याच्या प्रशासनाला देणे अपेक्षित आहे़ आॅगस्टमध्ये चारा छावणी सुरू केल्याचे भूषण सांगणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांनी खडे बोल सुनावले आहेत़ चारा कसा उगवायचा ते सांगू नका, दावणीला चारा द्या, सरसकट मदत करा, या मागणीचे आश्वासनही मिळू शकलेले नाही़ चारा छावण्यांपेक्षा दावणीला चारा देत थेट शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे़ लोकसंख्येच्या प्रमाणात टंचाईग्रस्त भागातील टँकरची संख्या ठरते़ त्याच धर्तीवर पशूधन संख्येवरही टँकरची संख्या वाढवावी, असा यापूर्वीचा शासन आदेश आहे़ त्यामुळे जनावरांच्या पाण्याची सोय टँकर आराखड्यात आणली पाहिजे़
कृष्णा खोऱ्याच्या पहिल्या लवादाने मान्य केलेले ७ टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली़ यापूर्वीच्या सरकारमध्ये ९ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ प्रत्यक्षात कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्याची वेळ आली आहे़ त्यामुळे ७ टीएमसीची मेहरबानी नको, हक्काचे पाणी दिले पाहिजे़ याशिवाय विभागात दीड लाख शेततळी, प्रत्येक जिल्ह्यात मनरेगाच्या माध्यमातून लोकांना रोजगार या दीर्घकालीन उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या़ त्यांनी ३ दिवसांत २९ गावांना भेटी दिल्या़ २५ ते ३० हजार लोकांशी संवाद साधला़