धक्कादायक! निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खोटी स्वाक्षरी, सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 17:15 IST2024-02-28T17:12:43+5:302024-02-28T17:15:49+5:30
CM Fake Signature : यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

धक्कादायक! निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खोटी स्वाक्षरी, सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार
Fake signature of Chief Minister Eknath Shinde : (Marathi News) मुंबई : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के वापरल्याचा धक्कादायक प्रकार मुख्यमंत्री सचिवालयात उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले आहे.
यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त झालेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शिक्के संशयास्पद व बनावट असल्याचे कर्मचाऱ्यांना निदर्शनास आले. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनीही गंभीर दखल घेतली असून, तत्काळ यासंबंधी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, मुख्यमंत्री सचिवालयास नियमितपणे मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शेरे असणारी विविध निवेदनं आणि पत्र पुढील कार्यवाहीसाठी प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होऊन ती ई ऑफिस प्रणालीत नोंद केली जाऊन संबंधित प्रशासकीय विभागांना पाठवण्यात येतात. मात्र, बनावट सही आणि शिक्का मारल्याचे लक्षात आल्यानंतर सचिवालयाकडून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. तसेच, कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.