शेतक-यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन
By admin | Published: June 1, 2017 05:07 PM2017-06-01T17:07:23+5:302017-06-01T18:24:48+5:30
राज्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर गेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांच्या या संपाबाबत मौन बाळगत लोणावळ्यातून काढता पाय घेतला.
Next
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 01 - राज्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर गेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांच्या या संपाबाबत मौन बाळगत लोणावळ्यातून काढता पाय घेतला.
लोणावळा नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी लोणावळ्यात आले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांचा संप व कर्जमाफी या प्रश्नांबाबत चकार शब्द सुद्धा काढला नाही. लोणावळा शहराला महाराष्ट्रातील महत्वाचे व पर्यावरण पुरक शहर करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देत मुख्यमंत्री म्हणाले, मागील आठ वर्षांपासून रखडलेली नगरपरिषदेची इमारत ज्या गतिमानतेने तुम्ही पुर्ण केली. त्याच गतिमानतेने प्रशासन चालवून सामान्य नागरिकांना मदत होईल, असे काम करा.
लोणावळ्याच्या पाणीपुरवठा योजनेकरिता 34 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. येथील नगरपरिषद रुग्णालय, बहुमजली पार्किंग, तलाव, रोप वे आदी कामांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मार्गी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पर्यावरण पुरक शहरे ही पर्यटकांचे नंदनवन आहे, ते सौंदर्य न राहिल्यास पर्यटक दुसर्या जागा शोध घेतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. याचबरोबर लोणावळा शहराचे महत्व वाढवत शहराला स्वच्छ व सुंदर बनवा, यासाठी राज्य सरकार तुमच्या पाठिशी आहे, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिला.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय तथा बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.