विधानसभेत शिवसेनेसोबत युतीबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 05:38 AM2019-05-22T05:38:59+5:302019-05-22T05:39:34+5:30
भाजपची बैठक; दुष्काळाबाबत टीकेला उत्तर देण्याचा आदेश
- यदु जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार की नाही या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रदेश भाजपच्या बैठकीत कोणतेही सूतोवाच केले नाही. शिवसेनेच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या नेते/कार्यकर्त्यांनी अतिशय चांगले काम केले, अशी शाबासकी मात्र त्यांनी दिली.
भाजपचे प्रदेश पदाधिकारी, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, संघटन मंत्री यांची बैठक पक्षांच्या दादरमधील कार्यालयात आज झाली. प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, पक्षाचे मंत्री प्रामुख्याने उपस्थित होते. येत्या विधानसभा निवडणुकीत युती होण्यासंदर्भात मुख्यमंत्री काय बोलतात या बाबत उत्सुकता होती; पण मुख्यमंत्र्यांनी त्यावर कोणतेही भाष्य केले नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी युतीची घोषणा करताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आम्ही विधानसभेलादेखील एकत्रितपणे सामोरे जावू असे जाहीर केले होते. २३ तारखेच्या निकालानंतर भाजप युतीबाबत काय भूमिका घेते या बाबत उत्सुकता असेल. आजच्या बैठकीत काही जिल्हाध्यक्षांना लोकसभा निवडणुकीबाबत तसेच दुष्काळासंदर्भात बोलण्याची संधी देण्यात आली. एकाही जिल्हाध्यक्षाने शिवसेनेसोबत युती विधानसभेसाठीही कायम ठेवावी, अशी भूमिका मांडली नाही. शिवसेनेच्या मतदारसंघातील जिल्हाध्यक्षांनी, ‘आपल्या कार्यकर्त्यांनी अतिशय मन लावून काम केले, अनेक ठिकाणी तर आम्हीच प्रचाराची यंत्रणा राबविली’, असे बैठकीत सांगितले. त्यावर, भाजप-शिवसेनेचे साडेचार वर्षात बरेचदा तणावपूर्ण संबंध असूनही वर आम्ही युती केल्याबरोबर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने शिवसेनेचे काम केले, अशी शाबासकी मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष दानवे व अन्य नेत्यांनीही मार्गदर्शन केले.
केंद्र व राज्य सरकारने अनेक लोकाभिमुख योजना आणल्या, त्यांचा मोठा फायदाही होत आहे पण आम्ही इतके सगळे केले हे सांगण्यात कमी पडतो, अशा कानपिचक्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या. दुष्काळ हाताळण्याबाबत शरद पवार सरकारवर टीका करत आहेत पण त्यांच्या सत्ताकाळात दुष्काळ कसा हाताळला आणि आम्ही किती कामे केली हे आपण दणकून सांगितले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जल्लोष करा पण...
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा दिल्लीत आपले सरकार येत आहे. परवा निकाल येतील तेव्हा जल्लोष नक्कीच करा पण राज्यात दुष्काळ आहे याचेही भान ठेवा. आपला जल्लोष हा टीकेचा विषय होता कामा नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
‘दुष्काळ निवारणात झोकून द्या’
दुष्काळ निवारणाच्या कामात २५ मे नंतर पक्षातील प्रत्येकाने झोकून द्यावे. प्रत्येक जिल्ह्यात दुष्काळाचा सामना करण्यासाठीचा एक मोठा उपक्रम पक्षाच्या पातळीवर सुरू करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.!