शेकापशी लढतीत भाजपला मुख्यमंत्र्यांचे बळ

By पंकज पाटील | Published: January 16, 2023 08:41 AM2023-01-16T08:41:32+5:302023-01-16T08:42:15+5:30

कोकण शिक्षक मतदारसंघात शिक्षक विरुद्ध संस्थाचालक असा संघर्ष

Chief Minister's strength for BJP in fight with Sheka | शेकापशी लढतीत भाजपला मुख्यमंत्र्यांचे बळ

शेकापशी लढतीत भाजपला मुख्यमंत्र्यांचे बळ

Next

पंकज पाटील, वरिष्ठ प्रतिनिधी

पालघरमध्ये खासदार राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीवेळी सोयीनुसार जसा पक्ष बदलण्यात आला, तसाच काहीसा प्रकार कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात झाला. हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ. तेथे सध्या शेकापचे बाळाराम पाटील आमदार आहेत. त्यांच्याशी त्यांच्याच पद्धतीने लढण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा उमेदवार भाजपने आयात केला. निवडणूक जरी पक्षचिन्हावर नसली, तरी पक्षीय पाठबळ आणि हितसंबंधच वरचढ ठरत असल्याने सध्या कोकणावर प्रभाव कुणाचा याची चाचपणी यानिमित्ताने होईल.

या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत बंडखोरीमुळे भाजपचा पराभव झाला. सलग दोनवेळा या मतदारसंघावर भाजपप्रणीत शिक्षक परिषदेचे रामनाथ मोते यांनी विजय मिळवला; मात्र २०१७ ला मोते यांच्याऐवजी भाजपने वेणूनाथ कडू यांना उमेदवारी दिली. नाराज मोते यांनी बंडखोरी करून भाजपचा उमेदवार पाडण्यास हातभार लावला.

भाजपच्या बंडखोरीचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडीचे बाळाराम पाटील यांना झाला. तेव्हा शिवसेनेकडून रिंगणात उतरलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भाजपच्या बंडखोर, अधिकृत उमेदवारांना मागे सारत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. पराभव झाला असला तरी म्हात्रे यांनी शिक्षकांसाठी काम सुरू ठेवले. शिवसेनेत फूट पडताच ते शिंदे गटात सहभागी झाले.  आघाडीचे बाळाराम पाटील यांना टक्कर देण्यासाठी भाजपकडे दमदार उमेदवार नसल्यामुळे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोंडी फोडत आपला उमेदवार त्यांना उपलब्ध करून दिला.

बाळाराम पाटील यांनी रायगडमधील आपला प्रभाव, संस्थांतील ताकद आणि शिवसेनेचा ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या पाठिंब्यावर भिस्त ठेवली आहे. त्याचवेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मात्र ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील भाजप, शिंदे गटाच्या आमदार, खासदारांच्या मदतीने वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. मागील सत्ताकाळात ते रायगडचे पालकमंत्री असल्याने त्याचा त्यांना कितपत उपयोग होतो, तेही यानिमित्ताने समजेल. पाटील आणि म्हात्रे यांच्यातील या थेट लढतीला शिक्षक विरूद्ध संस्थाचालक असेही स्वरूप देण्यात आले.

मागील निवडणुकीत गुरूजींना दिलेल्या पार्ट्या, महागड्या भेटवस्तुंची रेलचेल यांचाच बोलबाला होता. शिक्षकांच्या प्रश्नांपेक्षा उमेदवाराची आर्थिक ताकद, संस्थाचालकांचा प्रभाव, राजकीय पक्षांच्या व्यूहरचना आणि त्यांच्यातील शह-काटशहाचे राजकारण हेच या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे. 

- भाजपतील इच्छुक अनिल बोरनारे  पाटील यांच्याशी कितपत लढत देऊ शकतील, यावर वेगवेगळी मते असल्याने त्यांची संधी हुकल्याचे सांगितले जाते.

- शिक्षक भारतीची भूमिका यात कळीची ठरली असती, पण लढाईचे एकूण स्वरूप पाहून त्यांनी अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत.

- उमेदवार निश्चिती शिंदे आणि फडणवीसांची असली, तरी त्याची घोषणा मात्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. 

Web Title: Chief Minister's strength for BJP in fight with Sheka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.