चिखलीत आग; सव्वा कोटीचे नुकसान
By admin | Published: November 2, 2016 01:33 AM2016-11-02T01:33:42+5:302016-11-02T01:33:42+5:30
ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास फटाक्यांमुळे चिखलीतील लाकडी मालाचा साठा असलेल्या एका गोदामाला आग लागली.
पिंपरी : ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास फटाक्यांमुळे चिखलीतील लाकडी मालाचा साठा असलेल्या एका गोदामाला आग लागली. दिनेश शहा यांच्या मालकीचे गोदाम जळून खाक झाले. सुमारे सव्वा कोटींचे नुकसान झाले. रविवारी सायंकाळी लागलेली आग सोमवारी सायंकाळी आठ वाजेपर्यंत धुमसत होती. अग्निशामक दलाच्या जवानांची ही आग विझवताना अक्षरश: दमछाक झाली. अग्निशामक दलाच्या ३० गाड्या, ५ जेसीबी, १० टँकर आणि २०हून अधिक कर्मचारी सलग दोन दिवस आग विझवण्याच्या कामात व्यस्त होते. या आगीच्या घटनेमुळे अग्निशामक विभागाच्या कामकाजातील त्रुटींसह सुविधांच्या संदर्भात भेडसावणाऱ्या अनेक बाबी चव्हाट्यावर आल्या आहेत.
रविवारी सायंकाळी शहरात सर्वत्र दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी चिखलीत आकाशात झेपावणाऱ्या आगीच्या ज्वाळा, धुराचे लोळ दिसून आले. परिसरातील नागरिक, आजूबाजूचे गोदामाचे मालक, तसेच अग्निशामक दलाचे कर्मचारी यांची एकच धावपळ उडाली. एकापाठोपाठ एक दाखल होणाऱ्या अग्निशामकच्या बंबांनी पाण्याचे फवारे मारूनही आग आटोक्यात येत नसल्याने आजूबाजूचे गोदामाचे मालक भयभीत झाले. रात्रीच्या अंधारातही त्यांनी आपापल्या गोदामातील माल अन्यत्र हलविण्याची घाई केली.
चिखली, कुदळवाडी हा भंगार मालाची गोदामे असलेला परिसर आहे. नेहमीच या ना त्या कारणाने या परिसरात कोठे ना कोठे धूर पसरल्याचे दिसून येते. गतवर्षी अशीच मोठी आगीची घटना याच भागात घडली होती. तत्कालीन महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी या परिसरातील अधिकृत, अनधिकृत भंगार व्यावसायिक यांची माहिती मागवली होती. तेथील सर्वेक्षणाचा अहवाल घेऊन त्या माहितीच्या आधारे कोणत्या उपाययोजना करायच्या याचा कृती आराखडा तयार केला जाणार होता. मात्र, त्या सर्वेक्षण अहवालाचे काय झाले? हे अग्निशामक अधिकाऱ्यांनाही माहीत नाही. एवढेच नाही, तर या भागात पेठ क्रमांक १८मध्ये अग्निशामक केंद्र उभारण्याची गरज असल्याचा प्रस्ताव पालिकेला अग्निशामक विभागाने दिला आहे. पालिकेच्या स्थापत्य विभागाने केवळ पायाभरणी करून अर्धवट अवस्थेत काम ठेवले आहे.
कुदळवाडीत मोठी दुर्घटना घडल्यास वित्तहानीबरोबर जीवित हानी होऊ शकते. हे माहीत असूनही या भागात आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी गांभीर्याने दखल घेतली जात नाही. (प्रतिनिधी)
>चिखली, कुदळवाडीकडे महापालिकेचा काणाडोळा
चिखली, कुदळवाडी परिसरात भंगारमालाची दुकाने आहेत. नेहमीच या भागात आगीच्या घटना घडतात. सध्या त्या परिसरात लोकवस्ती वाढत आहे. अशा परिस्थितीत घडणाऱ्या घटनांमुळे मोठी हानी पोहचू शकते. या भागातील भंगार व्यावसायिक, गोदामे यांची योग्य ती माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. ही माहिती घेऊन तेथे उपाययोजना करण्याची तसदीही घेतली जात नाही. ज्या ठिकाणी लाकडाची, भंगारमालाची गोदामे आहेत, त्या ठिकाणी अग्निरोधक उपकरणे असणे बंधनकारक आहे. त्याची तपासणी करण्याचे, तसेच अशी उपकरणे बसविण्याची सक्ती करण्याचे काम अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांचे आहे. आग लागल्यानंतर ती विझविण्यासाठी यंत्रणा खर्ची घालण्यापेक्षा आगीच्या घटना घडू नयेत, याच्या दक्षतेच्या उपाययोजना महत्त्वाच्या असताना, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
>आग लागल्याचे कोणीच नाही कळवले
चिखलीत मोठी आग लागली,तरी कोणीही अग्निशामक विभागाला कळविले नाही. धूर दिसला म्हणून अग्निशामक दलाचे जवान स्वत:हून पोलीस ठाण्याजवळ पर्यायी व्यवस्था म्हणून उभा केलेला एक बंब घेऊन घटनास्थळी गेले, प्रयत्न केले. जादा कुमक मागवली. महापालिकेची विविध ठिकाणची अग्निशामक दलाची वाहने, ती अपुरी पडली म्हणून पुण्यातून बंब मागवले. पाण्याचे खासगी टँकर मागवले. बंदिस्त नसल्याने गोदामात लाकडी बॉक्सचे उंचच्या उंच थर रचले होते. आग विझवताना पाणी कमी पडले. टँकर भरून येईपर्यंत आग अधिक भडकत होती. त्यामुळे आग विझवताना अग्निशामक दलाच्या जवानांची अक्षरश: दमछाक झाली.
>चिखलीत आगीची मोठी घटना घडली. औद्योगिक क्षेत्रात लागणाऱ्या पॅकिंग बॉक्ससाठीचा सुमारे सव्वा कोटीचा लाकडी मालाचा साठा जळून खाक झाला. शहरात विविध ठिकाणी छोट्या-मोठ्या आगीच्या घटना घडल्याने त्या ठिकाणीही उपाययोजना कराव्या लागल्या. पाण्याच्या टँकरच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. तेथील काहींनी तातडीने पाणी उपलब्ध करून दिले. ज्यांची लाकडी मालाची, भंगार मालाची गोदामे आहेत, त्यांनी पाण्याच्या टाक्या बांधायला हव्यात. सर्वस्वी महापालिकेच्या यंत्रणेवर अवलंबून राहू नये. महापालिकेच्या अग्निशामक विभागाला आपत्कालीन परिस्थितीवेळी मदत उपलब्ध करून देताना मर्यादा येतात, हे लक्षात घ्यावे.
- किरण गावडे, अग्निशामक विभागाचे मुख्य अधिकारी