चिक्कीवरून विधानसभेत गदारोळ
By admin | Published: March 17, 2016 04:06 AM2016-03-17T04:06:17+5:302016-03-17T04:06:17+5:30
विधानसभेत पुन्हा चिक्की घोटाळ्यावरून गदारोळ झाला. या गदारोळात विरोधी पक्षांच्या काही सदस्यांबद्दल केलेले अवमानकारक विधान ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मागे घेणे भाग पडले.
मुंबई : विधानसभेत पुन्हा चिक्की घोटाळ्यावरून गदारोळ झाला. या गदारोळात विरोधी पक्षांच्या काही सदस्यांबद्दल केलेले अवमानकारक विधान ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मागे घेणे भाग पडले.
प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसचे अमिन पटेल आणि इतर सदस्यांनी आदिवासी विभागातील शाळांमध्ये निकृष्ट चिक्कीचा पुरवठा केल्याचा आरोप करीत प्रश्न उपस्थित केला होता. चिक्की निकृष्ट असूनही कंत्राटदाराविरुद्ध काहीच कारवाई का केली नाही, उच्च न्यायालयात सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटले
आहे, अशा प्रश्नांचा भडिमार विरोधी पक्ष सदस्यांनी केला.
आपण यापूर्वी वारंवार चिक्कीविषयी सभागृहात सविस्तर माहिती दिली आहे. तरीही हा प्रश्न का येतो माहिती नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी आणखी पाच वर्षेही या विषयावर प्रत्युत्तर देण्याची आपली तयारी असल्याचे सांगितले.
त्यातच विरोधी पक्षांच्या सदस्यांबद्दलच्या त्यांनी केलेल्या उल्लेखावरून गदारोळ झाला. त्यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील आदींनी
केली. (विशेष प्रतिनिधी)
चिक्कीत काहीही निकृष्ट नव्हते...
भाजपाचे अनिल गोटे हे मुंडे यांच्या मदतीला धावले. न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहिती सभागृहाला देणे नियमानुसार बंधनकारक नाही, असे त्यांनी म्हणताच विरोधक आक्रमक झाले.
भाजपा आणि विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच पंकजा यांनी, चिक्की खाण्यायोग्य असल्याचा अहवाल गाजियाबादच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेने दिलेला आहे. चिक्कीत काहीही निकृष्ट नव्हते.
अहमदनगर जिल्ह्यात एक तक्रार आली म्हणून आम्ही पुरवठा थांबविला. प्रत्यक्षात तेथे वाटप सुरूच व्हायचे होते, असे त्या म्हणाल्या. गदारोळ सुरू असतानाच प्रश्नोत्तराचा तास संपला.