चिक्की घोटाळ्यात सबका 'हात', काँग्रेस नेत्याच्या संस्थेला मिळाले कंत्राट
By admin | Published: June 26, 2015 12:50 PM2015-06-26T12:50:39+5:302015-06-26T12:51:19+5:30
महिला व बालकल्याण विभागातील चिक्की घोटाळ्यात काँग्रेसच्या महिला नेत्याच्या संस्थेला चिक्कीचे कंत्राट मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - महिला व बालकल्याण विभागातील घोटाळ्यामुळे पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक झाली असली तरी याप्रकरणात ज्या संस्थेला कंत्राट दिले ती संस्था सिंधुदुर्गमधील काँग्रेस नेत्या प्रज्ञा परब यांची असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चिक्कीचा 'गोडवा' भाजपासोबतच काँग्रेस नेत्यांनीही चाखल्याची चर्चा रंगली आहे.
महिला व बाकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी कंत्राटासंबंधींचे सर्व नियम पायदळी तुडवत एकाच दिवशी २४ अध्यादेश काढून २०६ कोटी रुपयांची खरेदी केली. यामध्ये चटई, चिक्की, पुस्तके आदी वस्तूंचा समावेश होता. या प्रकरणामुळे पंकजा मुंडे या चांगल्याच गोत्यात आल्या असून याप्रकरणी काँग्रेसने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रारही केली आहे. मात्र आता याप्रकरणात काँग्रेस नेत्याचे नाव आल्याने काँग्रेसचीही नाचक्की झाली आहे. पंकजा मुंडे यांच्या खात्यात निघालेल्या २०६ कोटींपैकी ११० कोटींचे कंत्राट हे सिंधुदुर्गमधील सुर्यकांता महिला औद्योगिक सहकारी संशअथेला देण्यात आली आहेत. या संस्थेच्या अध्यक्ष प्रज्ञा परब असून त्या काँग्रेसच्या महिला मोर्चाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आहेत. प्रज्ञा परब या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असून २०१० मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या संस्थेतर्फे अंगणवाडी व सरकारी शाळांमध्ये चिक्की पुरवली जाते. आमच्या संस्थेतील महिलांनी तयार केलेली चिक्की ही उच्च दर्जाची असतात. आमच्या सारख्या छोट्या संस्थांना ईटेंडरींगमध्ये सहभागी होणे शक्य नसल्याने आम्हाला सरकारने थेट कंत्राट दिले. या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला नाही असेही प्रज्ञा परब यांनी म्हटले आहे. प्रज्ञा परब किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने पंकजा मुंडे यांची भेट घेतलेली नाही असा दावाही परब कुटुंबीयांनी केला आहे.