चिक्कीला क्लीन चिट !
By admin | Published: July 8, 2015 01:43 AM2015-07-08T01:43:36+5:302015-07-08T01:43:36+5:30
अंगणवाडीतील बालकांसाठी पुरवण्यात आलेली राजगिरा चिक्की खाण्यास योग्य असल्याचा अहवाल शासकीय प्रयोगशाळेने दिला आहे. जिल्हा परिषदेला मंगळवारी अहवाल प्राप्त झाला.
अहमदनगर : अंगणवाडीतील बालकांसाठी पुरवण्यात आलेली राजगिरा चिक्की खाण्यास योग्य असल्याचा अहवाल शासकीय प्रयोगशाळेने दिला आहे. जिल्हा परिषदेला मंगळवारी अहवाल प्राप्त झाला.
जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार व मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी संयुक्तपणे अहवालाची माहिती दिली. चिक्की खाण्यास योग्य असल्याचे प्रयोगशाळेने सांगितले असले तरी जिल्हा परिषदेने थांबविलेल्या ४ लाख ५० चिक्की पाकिटांचे वाटप करण्यात येणार नसल्याचे नवाल यांनी सांगितले. ५ जुनला जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीच्या बैठकीत नगर पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांनी चिक्की मातीमिश्रित असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तेव्हापासून नगरसह राज्यभर चिक्की प्रकरण गाजत आहे.
दोन नमुने मुंबई आणि पुण्यातील शासकीय तर तीन नमुने एनएबीएल या शासन पुरस्कृत प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. शासकीय प्रयोगशाळेच्या नमुन्यांचा चाचणी अहवाल मंगळवारी महिला आणि बालकल्याण विभागाला प्राप्त झाला. (प्रतिनिधी)