चिक्कीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्हच!
By admin | Published: July 9, 2015 01:52 AM2015-07-09T01:52:43+5:302015-07-09T03:08:49+5:30
जिल्हा परिषदेला पुरवठा करण्यात आलेल्या मातीमिश्रित चिक्कीला सरकारी प्रयोगशाळेच्या अहवालात क्लीन चिट मिळाली असली, तरी अजून तीन अहवाल येणे बाकी असल्याने चिक्कीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.
अहमदनगर : जिल्हा परिषदेला पुरवठा करण्यात आलेल्या मातीमिश्रित चिक्कीला सरकारी प्रयोगशाळेच्या अहवालात क्लीन चिट मिळाली असली, तरी अजून तीन अहवाल येणे बाकी असल्याने चिक्कीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह कायम आहे.
उर्वरित तीन नमुन्यांचा प्रयोगशाळा काय अहवाल देते, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे़ अंगणवाडीतील मुलांना पुरविण्यात आलेली राजगिरा चिक्की मातीमिश्रित असल्याचे समोर आले़ त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनीही तिची चव चाखून चिक्की खराबच असल्याचे सांगितले होते. राज्य सरकारच्या पुणे आणि नाशिक येथील प्रयोगशाळांनी मात्र चिक्की खाण्यायोग्य असल्याचा अहवाल दिला आहे़ त्यामुळे या अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे़ हा अहवाल तयार करण्यासाठी थेट राज्य पातळीवरूनच तर दबाव टाकण्यात आला नाही ना, अशी चर्चाही जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे़
अंगणवाडीतील मुलांना देण्यात येणारी राजगिरा चिक्की मातीमिश्रित असल्याचे नगर तालुका पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांनी निदर्शनास आणून दिले़ अनेक ठिकाणांहून चिक्कीत माती असल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली होती. त्याबाबत जिल्हा परिषदेने महिला व बालकल्याण आयुक्तांना अहवाल पाठवून तक्रार केली.
आयुक्तांच्या आदेशानुसार अंगणवाड्यांना वाटलेली ४ लाख ५० हजार पाकिटे जप्त करण्यात आली़ चिक्कीच्या अनेक पाकिटांमध्ये माती आढळून आली, ती अनेकांनी पाहिली. मग प्रयोगशाळा तंत्रज्ञांना ही माती का नाही दिसली, असा सवाल उपस्थित होत आहे़ (प्रतिनिधी)