चिकुनगुनियामुळे मुलांमध्ये मेंदूच्या आवरणाला येतेय सूज; खबरदारी घेण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 05:52 AM2024-09-10T05:52:27+5:302024-09-10T05:53:03+5:30

माेठ्यांमधील चिकुनगुनिया आला मुलांमध्येही, शहरात व राज्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चिकुनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येत पाचपट वाढ झाली आहे. 

Chikungunya causes brain swelling in children; A call for caution | चिकुनगुनियामुळे मुलांमध्ये मेंदूच्या आवरणाला येतेय सूज; खबरदारी घेण्याचे आवाहन

चिकुनगुनियामुळे मुलांमध्ये मेंदूच्या आवरणाला येतेय सूज; खबरदारी घेण्याचे आवाहन

पुणे - चिकुनगुनियाचा त्रास म्हणजे येणारा ताप आणि नंतर काही आठवडे ते काही महिने राहणारी सांधेदुखी; पण आता या चिकुनगुनियाचा एक ते दाेन टक्के मुलांच्या मेंदूवर परिणामही दिसून येत आहे. म्हणजेच त्यांना एन्केफेलायटिसची (मेंदूच्या आवरणाला सूज येणे) लक्षणे दिसून येत आहेत. त्याचबराेबर त्यांच्यामध्ये यकृताचा संसर्ग, अंगावर पुरळ येणे, ते नंतर काळी पडणे, फिट्स येणे यासह काही मुले काेमामध्येही जाण्याइतपत गुंतागुंत हाेत आहे. शहरात व राज्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चिकुनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येत पाचपट वाढ झाली आहे. 

मुलांमध्ये गुंतागुंत

चिकुनगुनियामुळे मेंदूमध्ये गुंतागुंत झालेल्या अवघ्या सात महिन्यांच्या चंदननगर येथील बालिकेवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तिच्या सेरेब्रल फ्लुईड (पाठीच्या मणक्यातील द्रव) तपासणी केली असता त्यामध्ये चिकुनगुनियाचे विषाणू आढळून आले. या बालिकेला खूप ताप येत होता, तिला फिट्स येऊ लागले. तिला अतिदक्षता कक्षात दाखल केले, अशी माहिती बालरोग अतिदक्षता विभागतज्ज्ञ डॉ. सागर लाड यांनी दिली. 

बालरुग्ण वाढले

वरिष्ठ बालराेगतज्ज्ञ डाॅ. संजय मानकर यांनीही या प्रकरणाला दुजाेरा दिला. ते म्हणाले, मुलांमध्ये चिकुनगुनिया रुग्णांची संख्या वाढली आहे.  चिकुनगुनिया झालेल्या शंभरापैकी १ ते २ मुलांना त्याचा संसर्ग मेंदूपर्यंत जातो आणि त्यांना एन्केफेलायटिसची लक्षणे दिसतात.

मंकीपॉक्सवर लक्ष ठेवण्याचे आवाहन   

भारतात अद्याप एमपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेकडून मंकीपॉक्सबाबत सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी सोमवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. जिल्हा स्तरावर आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना मंत्रालयाच्या मंकीपॉक्स रोगाच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा प्रसार करण्याचे निर्देश दिले. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलद्वारे जारी केलेल्या सूचनांबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read in English

Web Title: Chikungunya causes brain swelling in children; A call for caution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य