चिकुनगुनियाचा उद्रेक
By admin | Published: September 24, 2016 01:11 AM2016-09-24T01:11:46+5:302016-09-24T01:11:46+5:30
सर्वाधिक प्रमाण चिकुनगुनिया या तापाचे असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे.
पुणे : सध्या जिल्ह्यात विषाणुजन्य आजारांनी डोके वर काढले असून त्यात सर्वाधिक प्रमाण चिकुनगुनिया या तापाचे असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. जानेवारीपासून १४ स्पटेंबरपर्यंत १८१ इतके आत्तापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाने दक्षता म्हणून सर्व प्रथामिक व उपकेंद्रांना सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सध्या विषाणुजन्य आजाराचे रुग्ण वाढत असून, सर्वाधिक प्रमाण हवेली तालुक्यात आहे. उत्तमगनर, फुरसुंगी, वाघोली या भागातील नागरिक तापाने फणफणले आहेत. डेंगीचे रुग्णही दिवसेंदिवस वाढत आहेत. बारामतीतील एका वकिलाचा दोन दिवसांपूर्वी डेंगीने मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्याचा अहवाल अजून आला नसून त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचेही आरोग्य विभागाने ‘लोकमत’शी बालताना सांगितले.
अधिक माहिती घेतली असता, या वर्षी जिल्ह्यात चिकुगुनियाची मोठी साथ असल्याचे समोर आले आहे. चिकुनगुनियाची साथ ठराविक वर्षांनंतर येते. विशिष्ट प्रकारचा डास दिवसा चावल्यामुळे हा ताप येतो. ‘टायगर मॉस्किटो’ असे त्या डासाचे नाव असून, तो दिवसा चावल्यामुळे हा ताप येतो. यात रुग्ण दगावण्याची शक्यता कमी असते. २०१३मध्ये १२, २०१४मध्ये ७ तर २०१५मध्ये फक्त ११ रुग्ण चिकुनगुनियाचे सापडले होते. मात्र, वर्षभरात जानेवारीनंतर १४ सप्टेंबरपर्यंत १८१ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या ३ वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण खूप मोठे आहे.
गेल्याही वर्षी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी चिकुनगुनिया तापाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे रुग्णांच्या शरीरात विषाणू मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे डेंगी व चिकुनगुनिया तापाचा या वर्षी जास्त प्रसार झाल्याची शक्यता आहे.
>डेंगीने आतापर्यंत
५ जणांचा मृत्यू?
जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत
डेंगीने ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. त्याचे अद्याप ठोस कारण समजले नाही.
आतापर्यंत डेंगीचे ४५५ संशयित रुग्ण असून, त्यांपैकी १०८ जणांना डेंगीची लागण झाली होती.
मलेरियाची साथही काही प्रमाणात असून, ४८ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत.
>काय काळजी घ्यावी?
डासअळी आढळल्यास : पाणीसाठे मोकळे करावेत; परंतु ते पाणी गटारात न ओतता जमिनीत ओतावे. अळीनाशकाचा वापर करावा,
डासोत्पत्तीची स्थाने शोधून तपासणी
विषाणुजन्य आजारामुळे आरोग्य विभागाने गावोगावी सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या असून, डोसोत्पत्तीची स्थाने क्लीन करण्यात येत आहेत. ज्या भागात असे संशयित रुग्ण आढळून येतील, तेथे आरोग्यपथक ताबोडतोब जाऊन तपासणी करीत आहे. ताप आटोक्यात येईपर्यंत आरोग्य कर्मचारी येथे लक्ष ठेवून असतात, असे जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांनी सांगितले.
>ताप आल्यास : कोणताही ताप अंगावर काढू नये. रक्ताची तपासणी करून घ्यावी. हिवतापाची तपासणी प्रत्येक सरकारी रुग्णालयात मोफत केली जाते. तापामध्ये कोणत्याही गोळ्या स्वत:च्या मनाने अथवा औैषध दुकानदाराकडून घेऊ नयेत. अॅस्पिरिन, ब्रुफेन अशा गोळ्यांमुळे डेंगी तापात रक्तस्रावाची भीती असते.