निवासी शाळेतील बालकांचे शोषण, ९ महिन्यांपासून सुरू होते अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 02:36 PM2017-10-08T14:36:27+5:302017-10-08T14:36:52+5:30
निवासी शाळा आणि वस्तीगृहातील दोन अल्पवयीन मुलांनी त्याच वस्तीगृहातील छोट्या मुलांचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक माहिती उघड झाली आहे.
नागपूर - निवासी शाळा आणि वस्तीगृहातील दोन अल्पवयीन मुलांनी त्याच वस्तीगृहातील छोट्या मुलांचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक माहिती उघड झाली आहे. दोन पीडत मुलांनी याबाबत ओरड केल्याने हा धक्कादायक प्रकार उघड झाल. त्यानंतर वस्तीगृह प्रशासनात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
गणेशपेठ परिसरात ही निवासी शाळा आणि वस्तीगृह आहे. येथे ही मुले शिक्षण घेतात अन् राहतात. गरिब कुटुंबातील या मुलांचा वयोगट ५ ते १५ वर्षांपर्यंतचा आहे. येथेच शिकणारे आणि राहणारे दोन १४ वर्षीय मुले १ जानेवारी २०१७ पासून ६ ते ९ वर्षे वयोगटातील बालकांवर लैंगिक अत्याचार करीत आहेत. त्यांच्यावर अनैर्सिग कृत्य करण्याची विकृती या अल्पवयीन आरोपींना जडली आहे. त्यांचा विरोध केल्यास हे दोघे सराईत गुंडांसारखे त्या बालकांना मारहाण करतात. त्यामुळे पीडित अनेक बालके भीतीमुळे अत्याचार सहन करीत आहेत. शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास आरोपींनी असाच प्रकार केला. त्याचा बोभाटा झाल्यामुळे शाळा तसेच वस्तीगृह प्रशासनाकडे या प्रकाराची माहिती पोहचली. त्यानंतर प्रशासनातर्फे रवींद्र भाऊरावजी भांदककर (वय ४२) यांनी गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पीडित दोन मुलांची तपासणी करून घेतली आणि आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्रशासनात खळबळ
ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली. बाल कल्याण विभागातील अधिका-यांसह अनेक वरिष्ठांना या प्रकरणाची माहिती कळविण्यात आली आहे. पोलिसांनी शनिवारी रात्री या प्रकरणात दोषी मुलांविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. आरोपी मुलांना रविवारी दुपारपर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलेले नव्हते. चौकशी सुरू असल्याचे पोलीस सांगत होते. अशाच प्रकारे अनेक बालकांचे येथे शोषण झाले असावे, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.