गडचिरोलीत हरक्विलीनग्रस्त जन्मले बाळ
By admin | Published: June 15, 2016 12:03 AM2016-06-15T00:03:13+5:302016-06-15T00:03:13+5:30
अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या हरक्विलीन या आजाराने ग्रस्त बाळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात ३१ मे रोजी जन्माला आले.
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. १५ - अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या हरक्विलीन या आजाराने ग्रस्त बाळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात ३१ मे रोजी जन्माला आले. पाच दिवस जिवंत राहिल्यानंतर सदर बाळाचा ४ जून रोजी मृत्यू झाला. मात्र नागपूर येथे अशाच आजाराच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर गडचिरोली येथील या बाळाच्या जन्माची घटना १४ जून रोजी उघडकीस आली.
निर्मला तिरुपती लेकूर रा. देवलमरी असे बाळाच्या आईचे नाव आहे. निर्मला ही प्रसूतीसाठी देवलमरी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती झाली. मात्र तिला उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे रेफर करण्यात आले. तिची प्रसूती अत्यंत गुंतागुंतीची वाटल्याने तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. ३१ मे रोजी निर्मलाला हरक्विलीन रोगग्रस्त मुलगी जन्माला आली. तिची त्वचा कडक व फाटली होती. काही ठिकाणांमधून रक्त बाहेर पडत होते. बोटे अत्यंत लहान होती. चेहरा दिसायला अत्यंत विद्रूप होता. त्वचेतून रक्त बाहेर निघत असल्याने संपूर्ण बाळ लाल रंगाचे दिसत होते. गडचिरोली रुग्णालयातील प्रसूतीतज्ज्ञांनी या बाळाला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्यात भरती करण्याचा सल्ला दिला. मात्र निर्मला लेकूर यांची परिस्थिती हलाखीची असल्याने या बाळाला नागपूर येथे हलविण्यास नकार दिला. गडचिरोली रुग्णालयातून सुट्टी करून त्याला देवलमरी येथे स्वत:च्या गावी घेऊन गेले. गावी नेल्यानंतरही सदर बाळ पाच दिवस जिवंत होते. ४ जून रोजी त्या बाळाचा मृत्यू झाला, अशी माहिती अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवराम कुमरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.