‘बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी समित्या स्थापणार’, राज्य बालहक्क आयोगाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:04 AM2017-10-11T04:04:09+5:302017-10-11T04:04:31+5:30
मुंबई : बाल लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी, सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी राज्यभर ग्राम आणि नगर स्तरावरील बाल संरक्षण समितींची स्थापना केली जाईल, तसेच बालकांच्या समस्यांबाबत जागृती वाढविण्यासाठी प्रशिक्षण आणि सशक्तीकरणाची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती, राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी दिली.
येथील सेंट अँड्र्युज शाळेच्या सभागृहात सोमवारी बाल अत्याचारमुक्त भारत अभियानाच्या शुभारंभप्रसंगी घुगे बोलत होते. देशातील प्रत्येक दुसºया बालकासोबत अत्याचाराची घटना घडत असते. विविध स्वयंसेवी संस्था, वर्ल्ड व्हिजन इंडिया (डब्लूव्हीआय) आणि बालहक्क आयोगाच्या माध्यमातून, २०२१ पर्यंत बाल लैंगिक गुन्हेगारी आणि शोषणाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राष्ट्रव्यापी मोहिमेची घोषणा केली आहे. घुगे म्हणाले की, बाल लैंगिक गुन्हेगारी थांबविण्याच्या प्रयत्नात समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. बाल लैंगिक अत्याचारांविरोधात जागृती निर्माण होत असल्यानेच, या प्रकरणातील गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी लोक पुढे येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.