उचलीच्या रकमेसाठी मुलाचे अपहरण
By admin | Published: February 16, 2017 03:54 AM2017-02-16T03:54:39+5:302017-02-16T03:54:39+5:30
ऊस तोडीसाठी वडिलांनी घेतलेली ३० हजार रुपयांची उचल परत न केल्याच्या वादातून दोघांनी दहावीत शिकणाऱ्या मुलास
सेलू (जि. परभणी) : ऊस तोडीसाठी वडिलांनी घेतलेली ३० हजार रुपयांची उचल परत न केल्याच्या वादातून दोघांनी दहावीत शिकणाऱ्या मुलास पळवून नेल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी अपहरणकर्त्यांविरुद्ध सेलू पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दिवाळीच्या आठ दिवसआधी सावरगाव (ता. जिंतूर) येथे राहणारा बडी पवार याने ऊस तोडणीसाठी कोल्हापूरला नेण्यासाठी हेलस (ता. मंठा) येथील विलास वाच्छू राठोड आणि त्याच्या पत्नीला ३० हजार रुपये उचल दिली. मात्र विलासच्या डोक्यात गाठ आल्याने त्यांना कामाला जाता आले नाही. तसेच उचलही शस्त्रक्रियेवर खर्च झाली.
दरम्यान, ८ फेब्रुवारी रोजी विलास राठोड यांचा मुलगा समाधान राठोड (१५) व त्याची आई चिकलठाणा येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. तेथे बडी पवार, रामा पवारही आले होते. ११ फेब्रुवारी रोजी समाधान गायब झाल्याचे लक्षात आले. १२ फेब्रुवारी रोजी बडी पवार याने विलासशी मोबाइलवरून संपर्क करून, पैसे देणे असल्याने समाधानला ताब्यात घेतल्याचे सांगितले. त्यानंतर राठोड यांनी बडी पवार, रामा पवार यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार केली़ (वार्ताहर)