पालघरमधील बालमृत्यू दरात घट - मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 05:33 IST2019-06-28T05:32:17+5:302019-06-28T05:33:11+5:30
अब्दुल कलाम आहार योजनेअंतर्गत गर्भदा व स्तनदा मातांना उच्च प्रतीचा पोषण आहार मिळावा, यासाठी बालआरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

पालघरमधील बालमृत्यू दरात घट - मुंडे
मुंबई : अब्दुल कलाम आहार योजनेअंतर्गत गर्भदा व स्तनदा मातांना उच्च प्रतीचा पोषण आहार मिळावा, यासाठी बालआरोग्य केंद्र सुरू करण्यात आले आहेत. आरोग्य विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाने संयुक्तरित्या केलेल्या कामामुळे बालमृत्यूदरात घट आली आहे. पालघर जिल्ह्यात विविध आजारांनी बालकांचे मृत्यू झाले असले, तरी कुपोषणाने एकही बालकाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती महिला व बालकल्याण विकास विभाग मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.
पालघर जिल्ह्यातील महिलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबत सदस्य अबू आझमी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुंडे म्हणाल्या की, पोषण आहारासाठी राज्यात स्वतंत्र निधी असून, बालमृत्यूचे प्रमाण कमी असण्यामध्ये शासन पहिल्या क्रमांकावर आहे. कुपोषण पूर्णत: संपविण्यासाठी शासन विशेष मोहीम राबविणार आहे.
पालघर जिल्ह्यात मुदतपूर्व प्रसुती झाल्याने १५ बालके दगावली, तर विविध आजारांमुळे बालके दगावल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र कुपोषणाने बालमृत्यू झाले नाहीत. केंद्र शासनाकडे अतिरिक्त धान्याची मागणी करण्यात आली असून, एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीसाठी आवश्यक गोष्टी प्राप्त झाले असल्याची माहितीही मुंडे यांनी दिली. या चर्चेत दिलीप वळसे-पाटील, अमिन पटेल, राजेंद्र पाटणी, वैभव पिचड यांनी सहभाग घेतला.