बाल विज्ञान परिषदेकडून घडवले जाताहेत बाल वैज्ञानिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 05:22 AM2019-02-28T05:22:20+5:302019-02-28T05:22:24+5:30
राष्ट्रीय स्तरावर झेप : सुवर्णपदके मिळविणाऱ्या मुंबईतील शाळांमधील आठ बाल वैज्ञानिकांचा सन्मान
मुंबई : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत या वर्षी मुंबईतील आठ विज्ञान प्रकल्पांची निवड झाली आहे. १० ते १७ वर्षे वयोगटातील या आठ विद्यार्थ्यांमधील विज्ञान संशोधन वृत्तीचा राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी शिक्षण विभागाने सत्कार केला.
मागील वीस वर्षांपासून मुंबईत शालेय शिक्षण विभाग आणि नवनिर्माण विज्ञान प्रबोधन यांच्या संयुक्त विद्यमाने बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येते. अनेक नामांकित शाळा यात दरवर्षी सहभागी होत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदके मिळवत असल्याची माहिती मुंबई बाल विज्ञान परिषदेचे अध्यक्ष बी. बी. जाधव यांनी दिली.
या स्पर्धेच्या तयारीसाठी मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये एक अशा १८ प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. यात प्रकल्पाचा मुख्य विषय आणि उपविषयावर तसेच संशोधन प्रकल्प पद्धतीवर मार्गदर्शन केले जाते. यातील दर्जेदार प्रकल्पांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केली जाते. २०१८-१९ या वर्षात राज्यस्तरीय परिषदेसाठी राज्यातून निवडलेल्या प्रकल्पांमधून ३० प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. यापैकी आठ प्रकल्प मुंबईतील आहेत. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे तर मुंबईतील जिल्हास्तरीय स्पर्धा नवनिर्माण विज्ञान प्रबोधन संस्थेमार्फत आयोजित करण्यात येतात. मुंबईतील आठ प्रकल्पांची निवड कौतुकास्पद असून बाल वैज्ञानिक घडविण्यासाठी बाल विज्ञान परिषद सातत्याने प्रयत्नशील आहे.
स्पर्धेत क्लोरोफिलिसिटी हीच शाश्वत ऊर्जा, टेट्रा पॅक आणि प्लॅस्टिक बॉटल्स यांच्यापासून बनविलेल्या वस्तूंचा तुलनात्मक अभ्यास, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, फायलोरेमेडिशन प्रकल्प अशा विविध विषयांवरील मुंबईतील ८ प्रकल्प सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.
सुवर्णपदकप्राप्त आठ प्रकल्पांसाठी विद्यार्थ्यांना मिळाले शिक्षकांचे मार्गदर्शन
च्‘क्लोरोफिलिसिटी हीच शाश्वत ऊर्जा’ यावर आधारित प्रकल्प सेंट जॉन्स हायस्कूल, बोरीवली पश्चिम येथील विवेककुमार यादव या विद्यार्थ्याने शिक्षिका मनाली राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. तर ‘टेट्रा पॅक आणि प्लॅस्टिक बॉटल्स यांच्यापासून बनविलेल्या वस्तूंचा तुलनात्मक अभ्यास’ हा प्रकल्प अरविंद गंडभीर, जोगेश्वरी या शाळेतील गुंजन सागवेकर या विद्यार्थिनीचा असून शिक्षिका विद्या रानडे यांनी तिला मार्गदर्शन केले.
च्मुंबईतील डॉन बॉस्को, जॉफ्री नाडर या विद्यार्थ्याने ‘कचरा व्यवस्थापन’ प्रकल्प सादर केला. त्याला अनिता फिलिप यांचे मार्गदर्शन लाभले. तर स्वाध्याय भवन, वडाळा फायलोरेमेडिशन मार्गदर्शन यांच्यातर्फे संध्या माने हिने ‘फायलोरेमेडिशन’ प्रकल्प सादर केला.
च्याशिवाय व्हीपीएम विद्या मंदिर, दहिसर, येथील अगस्ती देशपांडे याने रेश्मा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेला प्रकल्प; होली एंजेल्स, मुलुंड पश्चिम येथील अझिझा खानने अनिता राजशेखर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेला प्रकल्प; साधना विद्यालय, सायन, येथील निधी गुप्ता याने सिद्धी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेला प्रकल्प तसेच जे. जे. अॅकॅडमी, मुलुंड पश्चिम येथील वृत्ती पटेलने गायत्री राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेला प्रकल असे एकूण आठ संशोधनात्मक प्रकल्प सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.