लहान मुलांच्या दृष्टिकोनातून बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे
By Admin | Published: January 18, 2016 12:52 AM2016-01-18T00:52:59+5:302016-01-18T00:52:59+5:30
आजचा बालवाचक हा लिहिणाऱ्या साहित्यिकांपेक्षा १० टक्के पुढे आहे. यामुळे त्या बालसाहित्यिकांच्या दृष्टिकोनातून विचार करून बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे,
प्राची मानकर, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)
आजचा बालवाचक हा लिहिणाऱ्या साहित्यिकांपेक्षा १० टक्के पुढे आहे. यामुळे त्या बालसाहित्यिकांच्या दृष्टिकोनातून विचार करून बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे, तरच बालसाहित्य हे सकस होईल. तसेच पालक आणि समाज यांच्यातसुद्धा अभिरुची निर्माण झाली पाहिजे, तरच बालसाहित्य हे सकस होईल, असे मत बालसाहित्य व बालरंगभूमी सकस आहे का, या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.
८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘आजचे बालसाहित्य व बालरंगभूमी सकस आहे का?’ या विषयावरील परिसंवाद आचार्य अत्रे रंंगमंदिरात झाला. या वेळी सुरेश सावंत, माणिक वड्याळकर, डॉ. कांचन सोनटक्के, राजीव तांबे, स्वाती राजे, रमेश तांबे, महावीर जोंधळे या परिसंवादात सहभागी झाले होते. डॉ. डी. वाय. पाटीलच्या प्राचार्या रेखा पाठक, विश्वास वसेकर उपस्थित होते.
आजचे बालसाहित्य सकस आहे का, सकस असेल तर ते अधिक सकस कसे होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच बालसाहित्य हा विषय शाळेमध्ये स्वतंत्रपणे अभ्यासला गेला पाहिजे. यामुळे बालसाहित्याला एक वेगळीच दिशा मिळेल, असे स्वाती राजे यांनी सांगितले.
तांबे म्हणाले, ‘‘विज्ञान प्रयोग, विज्ञान भय, पर्यावरण असे वेगळे आशय असणारे साहित्य मुलांना वाचायला मिळाले, तर यामध्ये सकसता येईल. तसेच जी मुले नव्याने लिहीत आहेत, त्यांच्यासाठी कार्यशाळा घेऊन त्यांना काय लिहिण्यापेक्षा कसे लिहावे, हे शिकविले पाहिजे. बालरंगभूमीमध्ये सकसता आहे की नाही या विषयावर चर्चा करताना, त्यांचे तंत्र काय, याचा अभ्यास केला पाहिजे, यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.