बालभारतीने ‘संविधान’ बदलले
By Admin | Published: June 27, 2017 03:40 AM2017-06-27T03:40:26+5:302017-06-27T03:40:26+5:30
पुण्याच्या बालभारतीतर्फे यंदा इयत्ता सातवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. हिंदीच्या पुस्तकामध्ये ‘भारत का संविधान’ या पानावर शब्दांमध्ये चुका झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्याच्या बालभारतीतर्फे यंदा इयत्ता सातवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. हिंदीच्या पुस्तकामध्ये ‘भारत का संविधान’ या पानावर शब्दांमध्ये चुका झाल्या आहेत. धर्म ऐवजी पंथ आणि शुक्ल ऐवजी शुल्का अशा शब्दांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हे शब्द चुकीने छापले गेले आहेत की बदल करायचे ठरवून छापले गेले आहेत, याविषयी स्पष्टता द्यावी अशी मागणी ‘टीचर डमोक्रॅटिक फ्रंट’तर्फे (टीडीएफ) केली आहे.
हिंदी विषयाच्या पुस्तकात सुरुवातीच्या एका पानावर ‘भारत का संविधान’ छापलेले असते. यामध्ये दुसऱ्या ओळीत गेल्यावर्षीच्या पुस्तकात ‘धर्म -निरपेक्ष’ असा शब्द आहे. पण, यंदाच्या पुस्तकात ‘पंथनिरपेक्ष’ असा शब्द छापण्यात आला आहे. तसेच शेवटून तिसऱ्या ओळीत आधीच्या पुस्तकात ‘शुक्ल सप्तमी’ असा शब्द आहे.
नवीन पुस्तकात शुल्का सप्तमी छापण्यात आला आहे. धर्म हा योग्य शब्द आहे. आधी धर्म आहेत. त्यानंतर पंथ आणि संप्रदाय येतात. तरीही धर्म बदलून पंथ असा शब्दाचा उल्लेख केला आहे. तसेच शुक्ला हे आडनाव आहे.
मराठीच्या पुस्तकात ‘भारताचे संविधान’ या पानावर प्रस्तावना ऐवजी उद्देशिका शब्द छापण्यात आला आहे. प्रस्तावना म्हणजे सुरुवात आणि उद्देश त्यानंतर येतो. तरीही असे शब्द का छापण्यात आल्याचा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
संविधानासंदर्भातील शब्दांमध्ये बालभारती कसे काय बदल करु शकते. हे शब्द आहेत तसे वापरावेत असा नियम आहे. हे शब्द बालभारतीने स्वत: बदले आहेत. की चुकीने छापले गेले आहेत, याचा खुलासा करावा. या शब्दांमुळे अर्थ बदलत आहेत, हे लक्षात घ्यावे, असे टीडीएफचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी स्पष्ट केले.