बालचित्रवाणी अखेर पडली बंद!
By admin | Published: June 1, 2017 04:03 AM2017-06-01T04:03:56+5:302017-06-01T04:19:49+5:30
मुलामुलांचीऽऽऽ, मजेमजेचीऽऽऽ, बालचित्रवाणी... अखेर बुधवारपासून बंद झाली. केंद्र सरकारचे अनुदान बंद झाल्याने
पुणे : मुलामुलांचीऽऽऽ, मजेमजेचीऽऽऽ, बालचित्रवाणी... अखेर बुधवारपासून बंद झाली. केंद्र सरकारचे अनुदान बंद झाल्याने संस्था अडचणीत आल्यानंतर ती कायमची बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यामुळे नव्वदीच्या दशकातील एका मऱ्हाठी पिढीचे बालपण समृद्ध करणारी ही संस्था आता इतिहासजमा झाली आहे.
शैक्षणिक कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी २७ जानेवारी १९८४ रोजी बालचित्रवाणी म्हणजेच राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्थेची पुण्यात स्थापना करण्यात आली होती. बालचित्रवाणीने ६ हजार कार्यक्रमांची निर्मिती केली. पुण्यातील बालचित्रवाणीची सर्व स्थावर, जंगम मालमत्ता बालभारतीकडे वर्ग करण्यात येईल. तिथे ई-बालभारतीची स्थापना होणार आहे. बालचित्रवाणीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, कार्यक्रम निर्मिती व इतर सर्व खर्चासाठी केंद्र शासनाकडून मिळणारे १०० टक्के अनुदान नंतर बंद झाले. कर्मचाऱ्यांचा पगार एप्रिल २०१४पासून बंद झाल्याने कर्मचारी न्यायालयात गेले. मात्र औद्योगिक कलह कायद्यातील कलमानुसार ५०पेक्षा कमी कामगार असणारी संस्था आर्थिक विवंचनेत सापडल्यास बंद करता येते, असे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.
बालचित्रवाणीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य
ई-बालभारती संस्था कार्यान्वित झाल्यानंतर बालचित्रवाणीचे कर्मचारी ई-बालभारतीसाठी निश्चित केलेल्या आवश्यक पदांची शैक्षणिक अर्हता पूर्ण करीत असल्यास त्यांची गुणवत्तेनुसार निवड होत असल्यास वयाची अट न ठेवता त्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे शासनाने आदेशामध्ये स्पष्ट केले आहे. दरम्यान, बालचित्रवाणी संस्थेत कार्यरत कर्मचाऱ्यांना एक महिन्याची आगाऊ नोटीस देऊन
३१ मे २०१७पासून सेवामुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.