ब्रिटिशकालीन विहीर वाचवण्यासाठी वृद्धाची धडपड
By admin | Published: May 18, 2015 04:09 AM2015-05-18T04:09:26+5:302015-05-18T04:09:26+5:30
पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी वणवण भटकून रक्ताचे पाणी करणाऱ्या दिव्यातील नागरिकांची पाण्याच्या समस्येमधून काही प्रमाणात सुटका व्हावी,
कुमार बडदे, मुंब्रा
पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी वणवण भटकून रक्ताचे पाणी करणाऱ्या दिव्यातील नागरिकांची पाण्याच्या समस्येमधून काही प्रमाणात सुटका व्हावी, यासाठी येथील ब्रिटिशकालीन विहिरीवरील अतिक्र मण हटवण्यासाठी येथील जीवन म्हात्रे गेल्या चार वर्षे सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. दुर्देवाने शासन दरबारी आणि लोकप्रतिनिधींकडून म्हात्रेंसारख्या वृद्धाला न्याय न मिळाल्याने नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे.
दिवा (पूर्व) भागातील पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात येथील सर्व्हे क्रमांक २४ अ/६ मधील दोन गुंठे जागेवर तत्कालीन ग्रामस्थांनी निधी जमा करून विहीर बांधली होती. परंतु मागील ४ वर्षांपासून त्या विहिरीजवळ राहणाऱ्या काही जणांनी विहिरीवर लोखंडी जाळी टाकून त्यावर अतिक्र मण केले आहे. या अतिक्रमण करणा-यांकडून परस्पर त्यातील पाण्याचा वापर त्यांच्या इमारतीसाठी सुरू केला आहे.
स्थानिक नागरिकांना मात्र त्या विहिरीतील पाण्याच्या वापर करण्यास मज्जाव केला असल्याचा दावा
म्हात्रे यांनी केला आहे. यामुळे विहिरीच्या जवळपास राहणारे नागरिक तिच्या पाण्याच्या वापरापासून वंचित आहेत. त्यांची ही अडचण दूर व्हावी आणि त्यांनाही या विहिरीचे पाणी वापरता यावे, यासाठी संबंधित विहिरीवरील अतिक्र मण हटविण्यात यावे, याकरिता म्हात्रे चार वर्षांपासून शासनदरबारी वारंवार विनंती, अर्ज करीत आहेत.