बालकाश्रमातील विद्यार्थी जाणार विदेशात
By admin | Published: January 8, 2015 09:51 PM2015-01-08T21:51:25+5:302015-01-10T00:11:17+5:30
अटकेपार झेंडा : बालकाश्रमातून शिक्षण घेणाऱ्या दोघांचा सर्वांसमोर आदर्श, कष्टाला मिळाला न्याय
राजापूर : अपार कष्ट सहन करीत, मिळेल ती संधी आपल्यासाठी सोन्याचे आयुष्य घेऊन येणार असल्याची भावना ठेवून शिक्षण पूर्ण केले. बालकाश्रमात राहिलेले वैभव रवींद्र कोळेकर व सिद्धेश जागुष्टे हे शिक्षण पूर्ण केल्यावर आता नोकरीसाठी हाँगकाँग व कॅनडा येथे जात आहेत.वात्सल्य मंदिर संचालित बालकाश्रम, ओणी येथे स्वयंसेवी संस्थेत या दोघांनीही शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीनिमित्त ते भारताबाहेर जात आहेत.
वैभव कोळेकर हा वयाच्या नवव्या वर्षी आपल्या मोठ्या भावासह वात्सल्य मंदिर, ओणी येथे दाखल झाला. १० सप्टेंबर २००३ रोजी त्याने प्रवेश घेतला व दहावीपर्यंतचे शिक्षण या शिक्षण संस्थेत राहून पूर्ण केले. उपजत चित्रकलेची आवड लक्षात घेऊन त्याचे पुनर्वसन करण्यासाठी संस्थेने त्याला सावर्डे येथील सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट विद्यालयात प्रवेश दिला. चिपळूण (खेर्डी) येथील समाजकल्याण वसतिगृहात राहण्याची सोय केली. तेथे शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांनी त्याच्यातील उपजत कलेला योग्य तो आकार देत कलाकार जिवंत केला. आज पाच वर्षांच्या कालावधीत वैभवने जीडी आर्ट कोर्स पूर्ण केला आहे. आता आपल्या अंगभूत कौशल्याच्या आधारावर स्वत:ची कला दाखवण्यासाठी हाँगकाँग येथे भरारी घेतली आहे.
सिद्धेश सुरेश जागुष्टे हा विद्यार्थी कुटुंबातील गरीब परिस्थितीवर मात करीत या बालकाश्रमात दाखल झाला होता. त्यानेही ओणी येथे ९ जून २००३ रोजी प्रवेश घेतला व दहावीपर्यंतचे शिक्षण संस्थेत राहून केले. नवी मुंबई येथे पुढील शिक्षण घेऊन आता तो बी. ई. झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी नोकरीनिमित्त पुढील महिन्यात तो कॅनडा येथे दोन वर्षांसाठी रवाना होत आहे. येथे यंत्रमानवाच्या तंत्रज्ञानावर तो काम करणार आहे.
या विद्यार्थ्यांनी अपार कष्ट घेत शिक्षण पूर्ण करुन कलाकौशल्याला वाव मिळण्यासाठी भरारी मारली आहे. ओणी येथील बालकाश्रमात शिक्षण घेत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट उल्लेखनीयच म्हणावे लागतील. (प्रतिनिधी)
दोन विद्यार्थ्यांनी आश्रमात राहून शिस्त व शिक्षण पूर्ण केले. ध्येयाने प्रेरित होऊन आता परदेश वारीसाठी त्यांनी मोट बांधली आहे. या ठिकाणी हे विद्यार्थी कुटुंबाचे, मार्गदर्शकांचे व ज्या ठिकाणी शिक्षण घेतले त्या संस्थेला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करतील, असा विश्वास वात्सल्य मंदिर संचलीत बालकाश्रमाच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
शिक्षण घेत आपल्या अंगभूत कौशल्यांना वाव देण्याचा प्रयत्न.
ओणी, सावर्डे, वाशी आता हाँगकाँगपर्यंतचा प्रवास.
चित्रकलेची आवड लक्षात घेऊन सह्याद्रीने दिला वाव.
प्राचार्य प्रकाश राजेशिर्के यांनी अधिक शिक्षणासाठी दिला आपल्याला आकार.
नव्या आयुष्याला सुरूवात.