आभासी जगात हरवतेय बालपण!

By admin | Published: July 7, 2017 02:44 AM2017-07-07T02:44:02+5:302017-07-07T02:44:02+5:30

मैत्रिणीला पटवण्यासाठी नोबितासह त्याच्या मित्रांची चाललेली खटपट... डोरेमॉनने जियानपासून वाचण्यासाठी नोबिताला गॅझेट दिलेले असताना

Childhood in the virtual world! | आभासी जगात हरवतेय बालपण!

आभासी जगात हरवतेय बालपण!

Next

प्रज्ञा केळकर-सिंग/ लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मैत्रिणीला पटवण्यासाठी नोबितासह त्याच्या मित्रांची चाललेली खटपट... डोरेमॉनने जियानपासून वाचण्यासाठी नोबिताला गॅझेट दिलेले असताना त्याने त्याचा केलेला गैरवापर... हवेत सायकल उडवून शिवाने केलेला पराक्रम... जीटीएवाय सीटी या गेममध्ये गाड्या चोरणारा, पोलिसांना मारणारा मुलगा... सीओसी गेममध्ये दोन समूह बनवून भांडणारी मुले, असे आभासी जग चिमुरड्यांना हवेहवेसे वाटू लागले आहे. या आभासी जगात मुलांचे बालपण हरवत असून, ही धोक्याची घंटा असल्याची भीती मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कार्टून पाहून किंवा गेम खेळून चार वर्षांचा चिमुरडा घरात असभ्य भाषा वापरू लागल्यावर किंवा हिंसकपणे वागू लागल्यावर पालकांच्या काळजाचा ठोका चुकतो. चिमुरड्याचा विकास चुकीच्या पद्धतीने होत असल्याची अचानक जाणीव होते. मात्र, सुरुवातीला आपणच मुलांना मोबाईलची, टीव्हीची सवय लावल्याचे पालक विसरतात व त्यांच्या भविष्याची चिंता करू लागतात. आजकाल घराघरांत हे चित्र दिसू लागले आहे.
गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास झाला. मोबाईल, संगणक हे आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत. एकत्र कुटुंबांची जागा विभक्त कुटुंब पद्धतीने घेतली आहे. आई-वडील दोघेही नोकरदार असल्याने त्यांच्याकडे मुलांसाठी पुरेसा वेळ नसतो. अशा वेळी विरंगुळा म्हणून लहान मुलांच्या हाती मोबाईल सोपवला जातो. खेळणे म्हणूनच मुलांना मोबाईलची आणि टीव्हीची ओळख करून दिली जाते. या आभासी जगात रमणारी मुले समाजापासून दुरावत आहेत. त्यांच्यातील विध्वंसक प्रवृत्ती वाढीस लागत असून, आरोग्याबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

एकलकोंडेपणा, नकारात्मकता येतेय
वास्तव जगाशी मुले संबंध जोडू  शकत नसल्याने ती एकलकोंडी, चिडचिडी होतात. त्यांच्यात नकारात्मकता वाढीस लागते.
गेममधील क्रियेचे, कार्टूनमधील पात्राचे अनुकरण करीत असताना सातत्याने शिव्या देणे, मारामारी करणे असे घातक बदल मुलांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम करू लागले आहेत.
स्पायडरमॅन, बॅटमॅनप्रमाणे मी कुठेही चढू शकतो, उंचावरून खाली उडी मारू शकतो, एक बटण दाबून हवी ती गोष्ट घडवून आणू शकतो, शक्तीचा वापर करून समोरच्याला इजा पोहोचवू शकतो, अशा विचित्र कल्पना मुलांच्या मनात घर करू लागल्या आहेत.


सर्जनशीलता, कल्पकतेवर परिणाम

याबाबत माहिती देताना बालरोगतज्ज्ञ  डॉ. शिरीष गुळवणी म्हणाले, ‘‘मोबाईल, टीव्हीने मुलांचे आयुष्य व्यापून टाकले असून, ही विनाशाची घंटा आहे. आभासी जगात वावरण्याची सवय लागल्याने मुलांमधील शिक्षणाची, विकासाची प्रक्रिया, सर्जनशीलता, कल्पकता लोप पावत आहे. मोबाईल, टीव्हीची सवय अफूच्या गोळीप्रमाणे असून त्याचे विपरीत परिणाम समोर येऊ लागले आहेत. मोबाईलमधील किरणांमुळे मुलांमध्ये कर्करोगाच्या पेशी निर्माण होण्याची शक्यता वाढते. पालकांचे मुलांवर नियंत्रण राहिलेले नाही. या सवयीपासून मुलांना परावृत्त करायचे असेल, तर पालकांनी संवाद वाढविणे, मुलांना घरातील लहानसहान कामांमध्ये सामावून घेणे आवश्यक बनले आहे. मात्र, सध्याचा समाज संवेदनशून्य आणि निष्प्रभ झाला आहे. पालकांनी वेळीच स्वत:ला व मुलांना सावरणे गरजेचे बनले आहे.’’

सतत मोबाईल अथवा टीव्हीमध्ये रमल्याने मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने पालकांनी त्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. स्क्रीनकडे एकटक पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यातून पाणी येणे, लाल होणे, खाजणे असे त्रास सुरू होतात. कमी वयात चष्मा लागण्याची शक्यता निर्माण होते. मैदानी खेळ न खेळता अधिक वेळ टीव्ही पाहण्यात घालवल्यामुळे मुलांचे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांनी मैदानी खेळ खेळण्यास पसंती दिली पाहिजे. बौद्धिक विकासाला चालना देणारे खेळ खेळण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
- डॉ. शिरीष गुळवणी, बालरोगतज्ज्ञ

आई-वडील लहान वयातच मुलांच्या हाती मोबाईल सोपवतात. मोबाईल, टीव्हीमध्ये रमण्याची सवय लागल्याने मुले चिडचिडी, हट्टी बनतात. यामुळे सामाजिक बांधिलकी, व्यक्तिमत्त्व विकास, टीम वर्क, शेअरिंग आदी बाबींपासून मुले वंचित राहतात. मुलांमध्ये स्वमग्नतेची लक्षणे दिसू लागतात. यामुळे सामाजिकीकरण, भाषिक विकासाला मर्यादा येतात. यामुळे आई-वडील हतबल होतात. मोबाईल, टीव्हीच्या दुष्परिणामांबाबत अद्याप संशोधन झालेले नाही. मुलांना यातून बाहेर काढण्याच्या दृष्टीने समुपदेशन, प्ले थेरपी, आवडीनिवडी बदलणे, वर्तनसुधार तंत्र आदी उपचार पद्धतींचा वापर केला जातो.
- डॉ. उज्ज्वल नेने,
ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ,
केईएम हॉस्पिटल

Web Title: Childhood in the virtual world!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.