बालगृह आहे की छळछावणी? बीडमधील क्राैर्य; मारहाण, शौचालयही साफ करायला लावले 

By संजय तिपाले | Published: August 21, 2022 06:23 AM2022-08-21T06:23:05+5:302022-08-21T06:23:46+5:30

आदिवासी दिनाच्या दिवशी भीक मागत फिरणाऱ्या चिमुकल्यांना बालहक्क कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी शोधून आणले.

children concentration in jail Beaten and made to clean the toilet | बालगृह आहे की छळछावणी? बीडमधील क्राैर्य; मारहाण, शौचालयही साफ करायला लावले 

बालगृह आहे की छळछावणी? बीडमधील क्राैर्य; मारहाण, शौचालयही साफ करायला लावले 

googlenewsNext

संजय तिपाले

बीड :

आदिवासी दिनाच्या दिवशी भीक मागत फिरणाऱ्या चिमुकल्यांना बालहक्क कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी शोधून आणले. बालकल्याण समितीने त्यांना शासकीय बालगृहात ठेवले. मात्र, या मुलांचा तेथे अमानुष छळ झाला. त्यांना वेगळ्या खोलीत कोंडले, मद्यपान करून मारहाण केली व शौचालय साफ करायला लावले, असा गंभीर आरोप पालकांनी बालकल्याण समितीकडे केला आहे. बालगृहाचे अधीक्षक नितीन ताजनपुरे यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. 

नगररोडवरील पंचायत समिती इमारतीला चिकटून शासकीय बालगृह आहे. ७ ऑगस्ट रोजी पालावर राहणाऱ्या कुटुंबातील काही मुले भीक मागत असल्याची माहिती कांबळे यांना मिळाली. त्यांनी पालकांचे समुपदेशन केले. मुलांना बालगृहात ठेवण्याची विनंती बालकल्याण समितीकडे केली.

पालकांपुढे वाचला तक्रारींचा पाढा
९ ऑगस्ट रोजी १५ मुलांना समितीपुढे हजर केले. यापैकी १८ वर्षांखालील सहा मुलांना बालगृहात ठेवण्याचे आदेश समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी दिले. यांना वेगळ्या खोलीत ठेवले. सहा मुलांना चारच खाटा व फाटक्या गाद्या दिल्या. १९ ऑगस्टला परस्परच पालकांच्या स्वाधीन केले. बालकांनी छळाचा पाढा वाचला, त्यानंतर हे उजेडात आले. कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. भांडी, शौचालय साफ करायला लावले, असा आरोप केला. 

त्यांनी पालकांकडे सोपविताना समितीची परवानगी घेतली नाही. पालकांची तक्रार आहे. त्यांचे जबाब नोंदवून फौजदारी कारवाईसाठी पोलिसांना पत्र देण्यात येईल.
- अशोक तांगडे, अध्यक्ष, बालकल्याण समिती

स्वयंशिस्त लागावी म्हणून जेवण केलेली भांडी धुवायला लावली. मारहाण केली नाही. त्यादिवशी बालकल्याण समितीचे पदाधिकारी दौऱ्यावर होते. त्यांना फोनवरून कल्पना दिली होती.
- नितीन ताजनपुरे, अधीक्षक, शासकीय बालगृह

असा काही प्रकार घडल्याचे मला तुमच्याकडूनच कळत आहे. अद्याप यंत्रणेकडून माहिती मिळालेली नाही. सविस्तर अहवाल मागविला जाईल. दोषी असलेल्यांविरुद्ध योग्य त्या कारवाईची शिफारस करण्यात येईल.
- ॲड. प्रज्ञा खोसरे, सदस्या बालहक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र

Web Title: children concentration in jail Beaten and made to clean the toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.