स्वच्छतेसाठी मुले, मुली पोहोचले स्मशानभूमीत
By admin | Published: November 19, 2014 09:10 PM2014-11-19T21:10:42+5:302014-11-19T23:17:31+5:30
नवा आदर्श : फाटक हायस्कूल, गांगण महाविद्यालयाचा उपक्रम...
रत्नागिरी : रत्नागिरीत स्वच्छता मोहीम दिमाखात सुरू असून, या मोहिमेला विविध स्तरांतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी शहरातील फाटक प्रशाला व वि. स. गांगण कनिष्ठ महाविद्यालयाने तर मुरुगवाडा येथील श्रीमान भागोजीशेठ कीर अमरधाममध्ये स्वच्छता मोहीम राबवून एक नवा आदर्श निर्माण केला. ज्याठिकाणी माणसाचा प्रवास संपतो, त्याच ठिकाणाहून या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून नवा आदर्श घातला.
या मोहिमेत दीडशे विद्यार्थी, विद्यार्थिनींसह संस्था पदाधिकारी, शिक्षकांनी भाग घेतला. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनीही नगरपालिकेतर्फे अग्निशम बंब, जेसीबी मशिनची मदत केली. दि न्यु एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परुळेकर, सचिव दाक्षायिणी बोपर्डीकर, सुमिता भावे, मुख्याध्यापक आनंदा मोरबाळे यांच्यासह सर्व शिक्षक, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, उपनगराध्यक्ष संजय साळवी यांनी स्वच्छता मोहीमेत भाग घेतला.
या अमरधामच्या आवारात वाढलेले गवत, बाटल्या, लाकडांचे तुकडे, अन्य वस्तूंची साफसफाई करण्याचे काम केले. येथील काळवंडलेल्या भिंंती, फलकांना रंगरंगोटी करण्यात आली. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनीही स्वत: स्वच्छतेत भाग घेतला. शहरात सर्वत्र स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. मात्र, मृत्यूनंतर जिथे दहन केले जाते, अशा स्मशानभूमीकडे लक्ष दिले नव्हते. त्यामुळे फाटक प्रशालेने येथे सफाई मोहीम आखली. सकाळी आठ वाजता कामाला सुरूवात झाली. अकरा वाजेपर्यंत सफाईचे काम पूर्ण करण्यात आले. गवत साफ करण्यासाठी विद्यार्थ्यांना हातमोजे, मास्क देण्यात आले होते. तसेच काळवंडलेल्या भिंतींना निळा रंग लावण्यात आला. याशिवाय भागोजीशेठ कीर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अर्धाकृती पुतळ्याची सफाई करून, पुसलेल्या पाट्यांची रंगरंगोटीही केली. स्मशानभूमीच्या बाहेर वाढलेले गवतही कापण्यात आले. यावेळी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाद्वारे पाणी सोडून स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनींनीही यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)