मराठ्यांच्या लेकरांनो, आता खूप शिका, मोठे व्हा; मनोज जरांगे पाटलांचं भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 07:07 PM2024-01-27T19:07:47+5:302024-01-27T19:08:45+5:30

समाजातील प्रत्येकांच्या घरातील लेकरांसाठी लढतोय. जीव द्यायचीही तयारी आहे. समाजाची ताकद मी इंचही वाया जाऊ दिली नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

Children of Maratha community, learn a lot, grow up, Manoj Jarange Patil's appeal | मराठ्यांच्या लेकरांनो, आता खूप शिका, मोठे व्हा; मनोज जरांगे पाटलांचं भावनिक आवाहन

मराठ्यांच्या लेकरांनो, आता खूप शिका, मोठे व्हा; मनोज जरांगे पाटलांचं भावनिक आवाहन

मुंबई - मधल्या काळात खूप संकट आले. राज्यातील आमच्या समाजातील काही लोकांनीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मी खूप संघर्ष केला. सरकार आणि विरोधकांनी रचलेले षडयंत्र मी उधळून लावली. मी मागे हटलो नाही. समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे हेच माझे मत होते. सगेसोयराचा अध्यादेश निघाला. मराठा समाजाला याचा खूप फायदा होणार आहे. मराठा समाजाच्या लेकरांनी आता खूप शिका, मोठे व्हा. मला माझे शरीर कधी साथ देते, कधी नाही. उपोषण जीवावर घेतलं आहे. मी कधी दिसून दिले नाही पण लेकरं मोठी व्हायला हवी अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी भावनिक आवाहन केले आहे.  

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, खूप दशकानंतर या यशाची मराठा समाज वाट बघत होता. कायम मराठ्यांना येड्यात काढण्याचं काम केले जायचे. मराठे इतक्या ताकदीने मुंबईला आले. ६४ किमी रांग लागली होती. कोट्यवधी मराठा मुंबईत घुसला त्यानतंर दुसऱ्याच दिवशी अध्यादेश काढला. मराठा समाजाला मी मायबाप मानले, समाजाने लेकराचा दर्जा दिला. समाजाला हाक दिली तेव्हा समाज पाठिशी उभा राहिला. वेळेप्रसंगी माझ्या जीवावर बेतलं. पण काम करताना कधी हयगय केली नाही. आता सगेसोयऱ्यांचा अध्यादेश मराठ्यांनी हातात घेतलाच असं त्यांनी सांगितले. 

तसेच माझ्या समाजानं खूप त्याग केलाय. अनेकांची कुटुंब उघड्यावर आहे. ज्या मायमाऊलींच्या कपाळाचे कुंकू पुसलंय, कर्ता पुरुष गेल्यावर त्या घरावर काय बेततं हे बोलणे सोप्पे असते. मी लवकरच अशा कुटुंबाची भेट घेणार आहे. आपण जिद्दी आहोत, एका ध्येयावर अडलो तर मरायलाही मागे हटत नाही. समाज एकजूट झाला तर श्रीमंतांची गरज असावी असं काही नाही. सर्वसामान्य मराठ्यांनी ठरवलं, मला साथ द्यायची. समाजाची शक्ती समाजासाठीच वापरते. आता जबाबदारी वाढली, वेळेप्रसंगी जीव गेला तरी आरक्षण मिळवून द्यायचे हे मी ठरवलं. मी समाजातील प्रत्येकांच्या घरातील लेकरांसाठी लढतोय. जीव द्यायचीही तयारी आहे. समाजाची ताकद मी इंचही वाया जाऊ दिली नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

दरम्यान, जर मला फसवलं तर मी एकटा मुंबई चालू देणार नाही. दगाफटका होणार नाही. कायदा पारित होईल. कायदा पारित करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आता आरक्षणापासून मराठे वंचित राहणार नाही. हे श्रेय समाजाचे आहे. माझेही नाही. माझा लढा यापुढेही कायम राहणार आहे. रात्री ११ ते ३ वकील, तज्ज्ञ बोलावले. एका एका शब्दावर मंथन केले आहे. यापुढे लोकांना काय समजावून सांगायचे, कसं प्रमाणपत्र मिळवायचे यासाठी तालुकास्तरावर टीम तयार करणार आहे. शिंदे समितीच्या कामावर लक्ष ठेवणार आहे. लेकरांनी मोठे व्हावे, वेळेप्रसंगी पुन्हा मुंबईला यायची तयारी आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केले. 

Web Title: Children of Maratha community, learn a lot, grow up, Manoj Jarange Patil's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.