राज्यातील लहान मुले, गरोदर मातांना मोफत दूध भुकटी देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 05:24 AM2020-08-06T05:24:35+5:302020-08-06T05:25:32+5:30
लॉकडाउनमध्ये ६ एप्रिल ते २० जुलै या कालावधीत घेण्यात आलेल्या एकूण ५,९८,९७,०२० लिटर दुधापासून ४४२१.४७ मेट्रिक टन दूध भुकटी बनवण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात दूध भुकटीचे उत्पादन झाले असून ही भुकटी राज्यातील ६ लाख ५१ हजार लहान मुले, १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
लॉकडाउनमध्ये ६ एप्रिल ते २० जुलै या कालावधीत घेण्यात आलेल्या एकूण ५,९८,९७,०२० लिटर दुधापासून ४४२१.४७ मेट्रिक टन दूध भुकटी बनवण्यात आली आहे. तर ५८१ मे. टन देशी बटर बनवून एनसीडीएफआय या पोर्टलवर २१५ रुपये प्रति किलो या दराने विक्री साठी देण्यात आले आहे. यातून शासनाला १२.४९ कोटी रुपये मिळतील असे सांगण्यात आले. या बैठकीस दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, त्याचप्रमाणे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.