डायनिंग टेबलवर बसून मुले खातात खिचडी
By Admin | Published: June 26, 2017 02:33 AM2017-06-26T02:33:42+5:302017-06-26T02:33:42+5:30
सुंदर बागेने नटलेला शाळा परिसर, आॅनलाइन अध्यापनासाठी सोलार व्हर्च्युअल क्लासरूम, माध्यान्ह भोजनासाठी डायनिंग टेबल
विजय सरवदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सुंदर बागेने नटलेला शाळा परिसर, आॅनलाइन अध्यापनासाठी सोलार व्हर्च्युअल क्लासरूम, माध्यान्ह भोजनासाठी डायनिंग टेबल, शुद्ध पाणी, प्रशस्त मैदान या सुविधा म्हटल्या की, आपल्या डोळ्यासमोर लगेच शहरातील मोठ्या शाळाच येतील, पण केवळ या साऱ्या सुविधाच नव्हे, तर गुणवत्ताही जपली आहे, औरंगाबाद जिल्ह्यात एका दुर्गम खेड्यातील जिल्हा परिषदेच्या वस्तीशाळेने अन् हा बदल घडविला आहे, एका ध्येयवेड्या शिक्षकाने.
औरंगाबाद जिल्ह्यातील दुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या सिल्लोडच्या पळशी शिवारात असलेली जि. प. बडक वस्तीशाळेचे शिक्षक प्रकाशसिंग किसनसिंग राजपूत हे २००४मध्ये सुरुवातीला निमशिक्षक म्हणून सेवेत रूजू झाले. गावापासून दूर असलेल्या शेतवस्तीवर जिथे आजूबाजूला दूरपर्यंत आधुनिकतेचा कसलाही संबंध नाही, अशा ठिकाणी प्रकाशसिंग राजपूत यांनी अथक परिश्रमाच्या बळावर अनेक सुविधा निर्माण केल्या.
या शाळेत २०१५मध्ये व्हर्च्युअल क्लासरूम तयार करून, लगेच ती सोलार सीस्टिमवर कार्यान्वित करण्यात आली. माध्यान्ह भोजन योजनेत दिली जाणारी खिचडी एकाच वेळी ५० विद्यार्थी खाऊ शकतील, असे डायनिंग टेबल तयार करण्यात आले. पाण्याची समस्या उद्भवू नये, यासाठी शाळेलगत एक तलावही तयार करण्यात आला आहे.
आता आजूबाजूच्या शेतवस्तीवरील मुलेही बडक वस्तीशाळेत शिक्षणासाठी दाखल होत आहेत. आज या वस्तीशाळेची विद्यार्थी संख्या ५०च्या जवळ पोहोचली आहे. राजपूत यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात अशा ८ शाळांमध्ये आधुनिक सुविधा
निर्माण केल्या असून, सध्या या शाळांमध्ये विद्यार्थी संख्याही झपाट्याने वाढली आहे.